सरन्यायाधीशांचा सल्ला महत्त्वाचा

 (वाचक पत्र)


प्रेस मीडिया लाईव्ह :

नागपूर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या शताब्दी सोहळ्यात  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी वकील आणि न्यायाधीशांना दिलेला सल्ला अतिशय महत्त्वाचा आहे. 'राजकीय पक्ष नव्हे तर संविधानाशी एकनिष्ठ राहा ' हा त्यांनी दिलेला सल्ला अर्थातच प्रत्येक भारतीयालाही लागू आहे. कारण संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली होत असताना अनेक जण मूग गिळून गप्प राहणे पसंत करतात. कारण त्यांची बांधिलकी देशाशी, राज्यघटनेशी नसते तर विशिष्ट पक्षाशी आणि विचारधारेशी असते.

एखाद्या न्यायाधीशाने राजकीय दृष्टिकोनातून विशिष्ट निकाल दिला तर त्याला निवृत्तीनंतर तातडीने राज्यसभा अथवा महत्त्वाचे लाभाचे पद मिळते हे अलीकडे अनेकदा दिसून आले आहे.तसेच एखादा न्यायाधीश सेवा पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा देतो आणि लोकसभेचा उमेदवारही होतो. त्यावेळी जाहीरपणे मी पूर्वीपासूनच अलाण्या पक्षाच्या संपर्कात होतो हे जाहीरपणे सांगतो. असेही दिसून आले आहे. 

या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे म्हणणे महत्त्वाचे ठरते. न्यायपालिकेने वेळोवेळी आपले स्वातंत्र्य व निष्पक्षपातीपणा, कार्यपालिका,विधिमंडळ व राजकीय हित यासंबंधी सडेतोड भूमिका घेतली आहे. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि बारचे स्वातंत्र्य यांचा सखोल संबंध आहे. बारचे स्वातंत्र्य हे एका संस्थेच्या रूपात कायद्याच्या राज्याचे आणि घटनात्मक नियमांचे संरक्षण करण्यासाठी नैतिक ढाल म्हणून काम करते. हे त्यांचे मत फार महत्त्वाचे आहे.


प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

Post a Comment

Previous Post Next Post