जागृत मतदारच आंबेडकरांचा लोकशाही विचार पुढे नेऊ शकतो

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम अपराध यांचे प्रतिपादन 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.१४ डॉ. आंबेडकर यांना राजकीय लोकशाही प्रमाणेच सामाजिक लोकशाही अभिप्रेत होती . तो यांच्या अग्रक्रमावरचा विषय होता.प्रत्येक नागरिक सत्तेचा मालक चालक बनू शकतो. एक माणूस एक मत ऐवजी एक माणूस एक मूल्य ही भूमिका बाबासाहेबांनी मांडली ती फार महत्त्वाची आहे. नवाभारत सक्षम भारत घडवायचा असेल तर आंबेडकरांच्या विचारावर वाटचाल करावी लागेल.

 कारण त्यातूनच सर्वांगीण समता आणि समृद्ध लोकशाही निर्माण होऊ शकते. संसदीय लोकशाहीमध्ये लोकशाही जीवन पद्धतीचा आग्रह धरणे महत्त्वाचे असते. तसेच समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मतदार जागृती मोहिमेच्या भूमिकेचे समाज माध्यमातून जनजागरण करणे फार महत्त्वाचे आहे. जागृत मतदारच आंबेडकरांचा लोकशाही विचार पुढे नेऊ शकतो ,असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम अपराध यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात 'डॉ.आंबेडकर आणि लोकशाही ' या विषयावर बोलत होते. यावेळी समाजवादी प्रबोधिनीच्या मतदार जागृती मोहीम फलकाचेही अनावरण करण्यात आले. प्रारंभी महात्मा फुले व डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत पांडुरंग पिसे यांनी केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.


तुकाराम अपराध यांनी डॉ. आंबेडकर आणि लोकशाही या विषयाची अतिशय विस्तृत व अभ्यासपूर्ण मांडणी केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनावरण करण्यात आलेल्या मतदार जागृती मोहीम फलकावर ,मत हा आपला अधिकार आहे ती दान करण्याची, गहाण टाकण्याची किंवा विकण्याची वस्तू नाही , आपले मत अनमोल आहे ते आंधळेपणाने नव्हे तर डोळेसपणे देऊ या, निवडणूक व्यक्तीकेंद्रीत ,उमेदवार केंद्रित नको तर मतदार केंद्रित करूया, उमेदवारांकडून त्यांचा जाहीरनामा मागून घ्या तुलनात्मक विचार करून मत द्या,संवैधानिक मूल्यांचा आदर आणि जोपासना करणाऱ्या उमेदवारांनाच मत देऊ या अशा स्वरूपाचे आवाहन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास अन्वर पटेल,दयानंद लिपारे, देवदत्त कुंभार, शहाजी धस्ते,शकील मुल्ला, रामभाऊ ठिकणे, मनोहर जोशी,गजानन पाटील,अशोक मगदूम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शकील मुल्ला यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post