प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : देशभरातील मोठमोठ्या उद्योजकांना केंद्रीय तपास माध्यमांच्या साह्याने धमकावून किंवा त्यांना सरकारी कंत्राट देऊन त्या बदल्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोट्यावधी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉण्ड पक्षनिधी म्हणून स्वीकारले असून, इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याची जाणीव सर्वोच्च न्यायालयाला देखील झाली असल्यानेच त्यांनी भारतीय स्टेट बँकेला इलेक्ट्रॉल बॉण्ड खरेदी करणाऱ्यांची तसेच त्याच्या माध्यमातून पैसे गोळा करणाऱ्यांची यादी जनतेसमोर आणण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात आज आम आदमी पक्षाचे कार्याध्यक्ष अजित फाटके (पाटील) यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले. अजित फाटके (पाटील) म्हणाले, भाजपाने लोकशाहीचा गळा घोटला असून सर्वसामान्य जनतेने ज्या विश्वासाने त्यांना सत्ता दिली होती त्या सत्तेचा वापर करून त्यांनी मोठमोठ्या उद्योजकांकडून खंडणी स्वरूपात देणग्या स्वीकारल्या आहेत. ते पुढे म्हणाले आपल्याला अनेक प्रकारात असे दिसून येते की ज्या कंपन्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी पडल्या आहेत त्याच कंपन्यांनी सर्वाधिक इलेक्ट्रॉल बॉण्डची खरेदी केली असून ते इलेक्ट्रॉल बॉण्ड भाजपलाचं देण्यात आले आहेत.* इतक्या मोठ्या भ्रष्टाचारानंतर देखील केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची चौकशी केली गेली नाही. भाजपा हा सुडाचा राजकारण करत असून, राष्ट्रीय पक्षांपैकी आम आदमी पक्ष हा भाजपचा सर्वात मोठा विरोधक बनत चालला आहे आणि त्यामुळेच हेतू पुरस्सर आम आदमी पक्षाच्या नेत्यांना टारगेट केले जात आहे.
अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सतेंद्र जैन यासारख्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांना ज्या पीएमएलए ॲक्ट खाली अटक केली आहे तो अत्यंत चुकीचा कायदा असून भारतातील इतर कायद्यांमध्ये ज्या संस्थेने आरोप केले आहेत त्या संस्थेनेच ते आरोप सिद्ध करायचे असतात परंतु पीएमएलए या कायद्यानुसार ज्याच्यावर आरोप केले गेले आहेत त्यानेच आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे. अशा चुकीच्या धोरणामुळेच गेल्या दीड वर्षापासून आम आदमी पार्टीचे मनीष सिसोदिया व सत्येंद्र जैन सारखे नेते देखील जेलमध्येच आहेत.
ते पुढे बोलताना म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा जेणेकरून दिल्ली आणि पंजाब मध्ये भाजपला पुन्हा एकदा सत्ता मिळवता येईल असा प्रयत्न भाजपाकडून होत असल्यानेच अरविंद केजरीवाल यांना अटक केली गेली आहे परंतु केजरीवाल हे कुठल्याही प्रकारे राजीनामा देणार नसून आम आदमी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा अरविंद केजरीवालां इतकाच सक्षमतेने पक्षाचा प्रचार व प्रसार करेल.
यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे आणि धनंजय बेनकर, राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, व आम आदमी पक्षाचे सदस्य किरण कद्रे, तसेच मीडिया सहसंयोजक निरंजन अडागळे हे उपस्थित होते.