मणिपूर जळते आहे ? जबाबदार कोण?



प्रेस मीडिया लाईव्ह : 

गेले अडीच - तीन महिने मणिपूर शब्दशः पेटत आहे. हे सगळे केवळ भारतीय म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनही लाजिरवाणे आहे. संकुचित पक्षीय फायद्यापेक्षा ज्यांच्या मनात माणुसकीची ओल जिवंत आहे असे सत्ताधारी पक्षाचे काही, खासदार,नेते,कार्यकर्तेहीआता या गोष्टींचा निषेध करत आहेत.इतक्या अमानुष घटना घडत असताना तेथील राज्य सरकार आणि देशाचे केंद्र सरकार काहीही कारवाई करत नाही हे लाजिरवाणे  आहे. नव्या परिभाषेत असलेले हे डबल इंजिन सरकार आहे आणि तेच दोन्ही इंजिने बंद करून मौन धारण करते आहे. एरवी आपल्या वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेले नेतृत्व सुद्धा अनेक बाबतीत सोयीस्कर मौन पाळताना दिसते आहेच. सर्वोच्च न्यायालयानेच मणिपूर बाबत स्वतः लक्ष घालायचे सूतोवाच केल्यावर  काही वाचाळविराना कंठ फुटला आहे .तोही दोन-चार वाक्याचाच. आणि घडलेल्या घटनेची जबाबदारी कोणाची? यावर काहीही भाष्य न करणारा कंठ.


देश म्हणजे काय ? राष्ट्र म्हणजे काय ?राज्यघटना म्हणजे काय ? तिचे तत्त्वज्ञान काय ?विविधतेतील एकता म्हणजे काय ? एकतेतील विविधता म्हणजे काय ? सर्वसमावेशकता म्हणजे काय ? भारतीय संस्कृती म्हणजे काय? याचा काडीमात्रही विचार व विवेक नसलेली मंडळी आज केवळ आणि केवळ सत्ताकारणात मग्न आहेत. येन केन प्रकारे सत्ता मिळवण्यासाठी दंगली घडवणे ,कत्तली घडवणे, जाळपोळ घडवणे, मतदार याद्या हातात घेऊन अन्याय अत्याचार करणे असे निर्लज्जपणाचा कळस गाठणारे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत. पण आता हे सारे सर्वसामान्य माणसांच्या सहनशीलते पलीकडे जात आहे. एकीकडे बेरोजगारी पासून महागाई पर्यंतचे प्रश्न छळत असताना काही  नवेच प्रश्न तयार करून मूळ मुद्द्यावरून जनतेचे लक्ष हटवण्याचाही प्रयत्न सारखा होत आहे. आता हेही जनतेला कळून चुकले आहे 


गुन्हेगारांना शासन न होता त्यांची सुटका अलीकडे मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे.राजकारण एकदा केवळ सत्ताकारण बनले आणि सत्तेसाठी आपल्याच समाजात द्वेष पेरत ठेवण्याचा कार्यक्रम सुरू केला की काय होते हे या देशाने यापूर्वीही अनुभवलेले आहे. मणिपूर हे त्याचे पुन्हा एक नवे उदाहरण आहे. या प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळे वळण देण्याचा प्रयत्नही केला जाऊन सत्य दडपण्याचा प्रयत्नही होतो आहे. हे सगळे अंतिमतः आपल्याला देश म्हणून विकलांग करणारे आहे. मा.पंतप्रधानांनी संसदेत या घटनाक्रमावर सविस्तर भाष्य करणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर ते सत्य असण्याची गरज आहे.ते भाष्यही केवळ एका विशिष्ट पक्षाचा राजकीय नेता म्हणून नव्हे तरी या देशाच्या घटनात्मक पदावरील महत्त्वाची व्यक्ती म्हणून करणे अपेक्षित आहे. मणिपूरच्या घटनेला जे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. दंगलीमध्ये जे शेकडो सर्वसामान्य भारतीय मृत्युमुखी पडले, हजारो लोक विस्थापित झाले ,त्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले , सरकार व प्रशासन नावाची यंत्रणा कुचकामी ठरली याला जबाबदार कोण याचेही उत्तर मिळाले पाहिजे. कारण या साऱ्यात राज्य सरकार व केंद्र सरकार यांचा काहीही दोष नसेल तर सरकार नावाच्या यंत्रणेची गरज आहे काय ? त्यांचे नेमके काम काय ? हा प्रश्न पडू शकतो. जे घडत आहे त्यासाठी चीन सारख्या अन्य देशांकडे बोट दाखवून अथवा इतर राज्यांची तुलना करून जबाबदारी झटकता येत नाही.कारण हा देश गुंडा आणि पुंडांच्या विकृत मनोवृत्तीवर नव्हे ,बाहुबलावर नव्हे तर भारतीय राज्यघटनेच्या मूल्य व्यवस्थेवरच चालला पाहिजे.


प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी

Post a Comment

Previous Post Next Post