सांगली जिल्ह्यात दुधात भेसळ करणारे मोठे रॅकेट कार्यरत

  फक्त कारवाई, गुन्हा का दाखल नाही?


प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली जिल्ह्यात दुधात भेसळ करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. मात्र, याकडे अन्न व औषध प्रशासन पुरते दुर्लक्ष करत असून तक्रार आली तर भेसळ होत असलेल्या ठिकाणी जाऊन थातूर मातूर कारवाई करण्याचे फक्त सोपस्कार पार पाडले जातात.आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे काल अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत दुध भेसळ अड्ड्यावर छापा टाकला. दूध भेसळ सोल्यूशन, रिफाइंड खोबरेल तेल व डेअरी पर्मिट पावडर तसेच भेसळयुक्त गाय व म्हशीचे दूध असा एकूण एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला असून तो ताब्यात घेतला गेला.

मात्र, बनपुरीत झालेली कारवाई ही दूध व्यवसायातील भेसळ करणाऱ्या छोट्या केंद्रावर कारवाई झाली आहे. मात्र, दुधात भेसळ करणाऱ्या अनेक मोठ्या केंद्राकडे अन्न व औषध प्रशासन का दुर्लक्ष करत आहे? तिकडे का कारवाई करून भेसळ धंदा बंद होत नाही? असा सवाल नागरिक करत आहेत.

आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील दुध सेंटर चालक संजय पडळकर हा दुधात भेसळ करून भेसळयुक्त दूध एका मोठ्या केंद्राला पाठवत होता. याशिवाय दुधाची विक्री मोठ्या प्रमाणात करत असल्याची असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने बनपुरी येथील संजय पडळकरच्या दुध सेंटरवर छापा मारला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाला दुधामध्ये भेसळ करण्यासाठी दूध भेसळ सोल्यूशन, रिफाइंड खोबरेल तेल व डेअरी पर्मीट पावडर तसेच भेसळयुक्त गाय व म्हशीचे दुध असा एकूण एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला.

दरम्यान सदर भेसळ दूध सापडलेले साहित्य हस्तगत करण्यात आलं आहे. सदरची कारवाई ही अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मसारे यांच्यासह मेघना पवार व चन्नवीर स्वामी यांनी केली. या कारवाईमुळे आटपाडी तालुक्यात दुधामध्ये भेसळ होत असल्याचे सिध्द झाले आहे. दरम्यान, या कारवाईने आटपाडी तालुक्यातील दुधामध्ये भेसळ करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

दुधात भेसळ करणाऱ्या व्यक्तीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जातो. बनपुरीत अन्न व औषध प्रशासनाने दूध भेसळ अड्डयावर छापा टाकून कारवाई केली. मात्र, अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कारभाराबाबत चर्चा सुरू आहे. आटपाडी तालुक्यात बनपुरीशिवाय इतर ठिकाणीही भेसळीचे अड्डे चालू आहेत. त्याचा सातबारा अन्न व औषध प्रशासनाकडे असून त्यांच्यावर कारवाईची प्रतीक्षा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post