मार्केटयार्ड येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या शेडकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : मार्केटयार्ड येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या शेडकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे.यामुळे येथील अनधिकृत शेडची संख्या वाढतच आहे. आता डाळिंब व्यापारासाठी नव्याने शेड उभारण्याचा घाट बाजार समिती प्रशासनाने घातला आहे. आवारातील पाण्याची जुनी टाकी ते आंबेडकरनगर सीमाभिंतीपर्यंतच्या जागेसंदर्भात न्यायालयात दावा सुरू आहे. या जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट असतानाही त्या ठिकाणी डाळिंब व्यापारासाठी यार्ड उभारण्यात येणार आहे. त्याच्या माध्यमातून डाळिंबाच्या उलाढालीस चालना मिळेल आणि त्यातून समितीला बाजार शुल्काच्या रूपाने प्रतिवर्षी एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा दावा समिती प्रशासनाकडून केला जात आहे. आडत्यांकडून जागेची मागणी ः बाजार समिती आवारातील विविध शेतमालाच्या व्यापाऱ्यांकडून जागा कमी पडत असल्याचा दावा करीत बाजार समितीकडे जागा देण्याची मागणी केली जाते.

 यानुसार समितीने आवारात काही शेड उभारण्यास परवानगी दिली. यातील काही शेड या आडत्यांनी खर्च करून उभारल्या आहेत. काही वर्षांपूर्वी गुरांच्या बाजाराजवळ कांदा-बटाटा व्यापारासाठी शेड उभारण्यात आली. आंब्याच्या हंगामात तात्पुरती शेड उभी केली जाते. डाळिंब व्यापारासाठी फळ बाजाराजवळ जागा काही वर्षांपूर्वी देण्यात आली आहे. महापालिकेकडून दुर्लक्ष ः बाजार समितीच्या आवाराचा विकास आराखडा हा पुणे महापालिकेने मंजूर केला आहे. या मंजूर आराखड्यानुसार सुरुवातीला बांधकाम झाले परंतु नंतर झालेल्या अतिक्रमणांकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या शेडला तात्पुरत्या स्वरूपाची परवानगी मिळू शकते; परंतु ही परवानगी घेण्याची औपचारिकताही समिती प्रशासनाकडून केली जात नाही. चौकशींचे काय झाले? बाजार समितीत उभ्या राहणाऱ्या शेड या नेहमीच वादात राहिल्या आहेत. या संदर्भात चौकशी समिती नियुक्त करण्यात आली; परंतु या चौकशी अहवालांचे काय झाले..? 

Post a Comment

Previous Post Next Post