महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील सुनावणी 10 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील पुढील सुनावणी येत्या 10 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण सध्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आहे.ते सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मागील सुनावणीत केली होती.

महिनाभरानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मंगळवार 10 जानेवारीच्या कामकाजात सकाळी साडेदहा वाजता त्यावर सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीवेळी हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडून सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे दिले जाणार का या महत्वाच्या मुद्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

या सत्ता संघर्षाप्रकरणी घटनापीठाने आठ मुद्दे निश्चित केले आहेत. त्यातील एका मुद्दय़ावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करावे अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात हा मुद्दा आहे. जेव्हा एखाद्या पीठासीन अधिकाऱ्याच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव असतो. तेव्हा तो प्रस्ताव प्रलंबित असताना ते आपात्रतेची कारवाई करू शकतात की नाही? अपात्रतेचा अधिकार नेमका कुणाकडे आहे? असा तो मुद्दा आहे.त्या मुद्यावरून हे प्रकरण विस्तारीत घटनापीठाकडे जावे अशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post