पिंपरी चिंचवड : निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने प्रयत्न सुरू , विरोधी पक्षांनीही हालचाली वाढविल्याने बिनविरोध निवडीची शक्‍यता धूसर



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या जागेवरील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केलेले असतानाच इतर विरोधी पक्षांनीही हालचाली वाढविल्याने बिनविरोध निवडीची शक्‍यता धूसर झाली आहे.त्यातच महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी स्थानिक पातळीवर निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने राज्यस्तरावरील महाविकास आघाडी या मतदारसंघात संपुष्टात येण्याची शक्‍यता आहे. तर आप, समाजवादीसह इतर पक्षांनीही तयारी चालविल्याने येथील निवडणूक ही बहुरंगी होण्याची शक्‍यता बळावली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून आमदार लक्ष्मण जगताप यांनी या मतदारसंघावर वर्चस्व राखले होते. सलग तीनवेळा विजय संपादन करत हॅटट्रिक साधली होती. मात्र, नुकतेच त्यांचे निधन झाले. या रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. येत्या 26 तारखेला या जागेसाठी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज 31 जानेवारीपासून भरण्यास सुरुवात होणार असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही 7 फेब्रुवारी असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.

भाजप बिनविरोधसाठी प्रयत्नशील

भारतीय जनता पक्षाने सर्वच पक्षांना लेखी पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले आहे. शहरातील प्रमुख पक्षांसह छोट्या पक्षांनाही भावनिक आवाहन करत पोटनिवडणुकीत उमेदवार न देता मदत करावी, अशी विनंती केली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी


राज्यस्तरावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तीन पक्ष कार्यरत आहेत. मात्र चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी या तीनही पक्षांमध्ये एकवाक्‍यता नसल्याची बाब समोर आली आहे. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी चालविली असून बैठकांचा धडाका चालविला आहे. तर राष्ट्रवादीनेही एकमताने ठराव करत पक्षाच्या चिन्हावर निवडणूकलढविण्याची भूमिका जाहीर केली आहे. प्रदेश स्तरावरून याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे काय निर्णय घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे दोनही पक्ष तयारीला लागले असतानाच कॉंग्रेसने एक पाऊल पुढे टाकत इच्छुकांचे अर्ज मागविल्याने या तीनही पक्षांमधील बिघाडी समोर आली आहे. वरिष्ठ पातळीवरून एक उमेदवार देण्याचे निश्‍चित झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील नेते एकत्र येणार हा प्रश्‍नदेखील यामुळे निर्माण झाला आहे.


छोटे पक्षही तयारीत 

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक छोटे पक्ष कार्यरत आहेत. त्यापैकी आप व समाजवादी पक्षाने निवडणुकीत उतरण्याच्या तयारीला वेग दिला आहे. वंचित बहुजन पक्षाकडून अद्याप भूमिका जाहीर केलेली नसली तरी या पक्षाचे काही इच्छुक निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. या तीन पक्षांशिवाय एमआयएमकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे सुतोवाच करण्यात आले आहे. या छोट्या पक्षांसह काही अपक्षांनीही तयारीला वेग दिल्यामुळे चिंचवडची निवडणूक ही बहुरंगी होण्याची शक्‍यताच अधिक निर्माण झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post