सिने कामगारांना त्यांच्या हक्कांची घरे उपलब्ध करून देण्याचा विचार आहे

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई - चित्रपट निर्माते धुंडिराज गोविंद फाळके यांचा 'राजा हरिश्चंद्र' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट. आता जिथे या चित्रपटाच्या आऊटडोअर शूटिंगला सुरुवात झाली होती, तिथे दादासाहेब फाळकेंच्या नावाने एक निवासी योजना सुरु होत आहे. या योजनेद्वारे सिने कामगारांना त्यांच्या हक्कांची घरे उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. महाराष्ट्रातील वांगणी शहरातील शेलूमध्ये ही योजना सुरु होत आहे.

दादासाहेब फाळके गृहनिर्माण योजनेत, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूआयसी) आणि पाध्ये ग्रुपच्या मदतीने, पंतप्रधान गृहनिर्माण योजनेंतर्गत सिनेमा कामगारांसाठी १०,०८० घरे बांधली जात आहेत. या गृहनिर्माण योजनेसाठी फेडरेशनतर्फे रविवारी साईट व्हिजिट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये फेडरेशनशी संलग्न असलेल्या युनियनचे सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५२२ घरे बांधण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. पहिला टॉवर १६ मजल्यांचा असेल ज्यामध्ये लिफ्ट, बहुउद्देशीय हॉल आणि इतर अनेक सुविधा असतील. या गृहनिर्माण योजनेच्या मुख्य गेटला दादासाहेब फाळके यांच्या पत्नी सरस्वतीबाई फाळके यांचे नाव देण्यात येणार आहे. कर्जतच्या प्रसिद्ध एनडी स्टुडिओजवळ ही निवासी योजना बांधली जात असून, या स्टुडिओमध्ये सध्या अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे.

यावेळी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, मोठ्या संख्येने चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्या लोकांनी येथे स्थायिक होण्यास उत्सुकता दाखवली आहे. आता शेलूकडे अधिकाधिक लोकांचा कल यावा यासाठी येथे वीज आणि पाण्याची योग्य व्यवस्था करणे ही माझी जबाबदारी आहे .

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष बीएन तिवारी म्हणाले की, पडद्यामागील कलाकारांचे स्वप्न या गृहनिर्माण योजनेत साकार होत आहे.बांधकाम व्यावसायिक अंकुर पाध्ये म्हणाले की, चित्रपटसृष्टीतील कामगारांना घरे देण्याचे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. यापूर्वी वडिलांनी सोलापुरात विडी कामगारांना केवळ ६० हजार रुपयांत घर दिले होते.रविवारी झालेल्या या कार्यक्रमात अभिनेते गजेंद्र चौहान, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रकांत पुसाळकर, संगीतकार अमर हळदीपूरकर, एफडब्ल्यूआयसीईचे मुख्य सल्लागार आशिष शेलार,एफडब्लूआइसीई चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे,अमरजीत सिंह, पूर्व श्रम आयुक्त सावंत,राजा खान,शेलू ग्रामपंचायत चे सरपंच शिवाजी खादिक,दामाद ग्रामपंचायत चे सरपंच जलील अनीस मॉझे, महिला साउंड रिकॉर्डिस्ट चंपा तिवारी,घोसालकर मैडम,वसंत जी,खालिद जी,,सौरभ मंगलेकर,शोएब डोंगरे आदींनीही मनोगत व्यक्त केले. या गृहनिर्माण योजनेत चित्रपटसृष्टीशी निगडित लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केवळ साडे बारा लाख रुपयांमध्ये घरे दिली जात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post