भोर तालुक्यातील स्वप्नपुर्ती महिला ग्रामसंघाचा एल.ई.डी. बल्ब प्रकल्प पथदर्थी- अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : स्वप्नपुर्ती महिला ग्रामसंघाने राबविलेला एल.ई.डी. बल्ब निर्मिती प्रकल्प पथदर्शी असून येत्याकाळात राज्यात एक मोठा उद्योग समूह म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्यक्त केला. राज्यातील प्रत्येक गावातील महिलांपर्यंत अशा स्वरूपाचे नावीन्यपूर्ण उपक्रम पोहचवून त्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. 

भोर तालुक्यात खोपी गावातील स्वप्नपूर्ती महिला ग्रामसंघाच्यावतीने राबविण्यात उपक्रमांना दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे, मिलिंद टोणपे, भोर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय धनवटे, पेसाचे सहसंचालक विक्रांत बगाडे, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ आणि महिला बचत गटातील सदस्या उपस्थित होत्या.

ग्रामसंघाने सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून श्री. कुमार म्हणाले, ग्रामसंघातील गटाच्यावतीने राबविण्यात आलेला एल.ई.डी. बल्ब बनविणे व दुरूस्त करण्याबाबतचा उपक्रम पथदर्शी आहे. या उपक्रमाच्या धर्तीवर राज्यातील इतर जिल्ह्यातील महिला समूह गटांना उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहित करणार असल्याचे सांगत नवनवीन उपक्रम राबविण्याबाबत सूचना केल्यास त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. उमेद व एमएसआरएम अभियानाच्यामाध्यमातून अधिकाधिक महिलांपर्यंत महिला समक्षीकरण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे श्री. कुमार म्हणाले.

महिला बचत गट व ग्रामसंघाना सोई-सुविधा पुरविणार

श्री.प्रसाद म्हणाले, शासनाच्या उमेद व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामधून जास्तीत जास्त महिला बचत गटांना लाभ मिळण्यासोबतच जिल्हा परिषद निधीअंतर्गत  ग्रामसंघाना त्यांचे व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोई-सूविधा व कायदेशीर मार्गदर्शन पुरविण्यात येणार आहे.

महिला बचत गटांना जि.प.निधीअंतर्गत निवडक गटातील प्रति बचत गटास प्रायोगिक तत्वावर २ लाख रूपये अनुदान व राष्ट्रीयकृत बँकेमार्फत पुरवठा करणेत आलेल्या अर्थसहाय्यातून पुण्यश्री सुपर शॉपींची स्थापना येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात भोर व मावळ तालुक्यात प्रत्येकी १ किरकोळ विक्रीचे दुकान करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती व उमेद अभियानाअंतर्गत जिल्ह्यात मागील २ वर्षात बचत गटांची संख्या ४ हजारावरुन २४ हजारवर पोहोचली आहे. २०१९ - २० या वर्षात ५९ कोटी, २०२०-२१ वर्षात ९८ कोटी व २०२१-२२ वर्षात २०२ कोटी कर्ज वाटप झाले आहे.  चालू आर्थिक वर्षाअखेर जिल्ह्यातील महिला बचत गटांना एकूण ४०० कोटींची कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बँकेमार्फत करण्यात येणार आहे, असे श्री.प्रसाद म्हणाले.

स्वप्नपूर्ती महिला ग्रामसंघ

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) पुणे अंतर्गत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात खोपी गावामध्ये एकूण २३ महिला बचतगटांनी एकत्रित येऊन स्वप्नपूर्ती महिला ग्रामसंघाची स्थापना केली. या अंतर्गत मैत्री, जिजामाता, जीवन आनंद, क्रांती ज्योती, उत्कर्ष स्फुर्ती व प्रेरणा या एकूण ७ समूहातील एकूण ११ महिलांनी शासन, स्वयंसहायता गटातील महिलांकडील निधी तसेच राष्ट्रीयकृत बँकेमार्फत पुरवठा करण्यात आलेले अर्थसहाय्य ड्रीम एल.ई.डी. लाईट प्रकल्पाची सुरुवात केली.  

कुक्कुट पालन व्यवसाय अंतर्गत सुरवातीला (१५ हजार पक्षांचे ) वातानूकुलीत व स्वयंचलित १० गुंठ्यात पोल्ट्रीशेड हे मैत्री, उत्कर्ष जिजामाता, जीवन आनंद व प्रेरणा या ५ समुहातील २० महिलांनी एकत्रित येऊन तब्बल ७० लाखाच्या प्रकल्पाची उभारणी केली आहे. त्याच बरोबर स्वयंसहायता महिलां गटांच्या माध्यमातून मनरेगा व कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात आंबा व तैवाण पेरू या फळपिकांची लागवड केली आहे.  ग्रामसंघाने गावामध्ये घणकचरा व्यवस्थापन, कंपोस्ट खत, गांडूळ खत प्रकल्पाची उभारणी केली आहे.

ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेला भेट

    राजेश कुमार यांनी  मांजरी फार्म येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेलाही भेट दिली. 

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, संस्थेचे प्राचार्य राहूल काळभोर आदी उपस्थित होते.

श्री. कुमार म्हणाले, ग्रामसेवक हा गावपातळीवर काम करणारा महत्वाचा घटक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार यासारख्या आदर्श गावे निर्माण झाली पाहिजे. ग्रावपातळीवर काम करताना विविधप्रकारच्या अडचणी येतात परंतु अशा परिस्थितीत सक्षमपणे काम करणारा ग्रामसेवक तयार झाला पाहिजे, यादृष्टीने शासन काम करीत आहे. गावांचा पायाभूत विकास करुन आदर्श गावे निर्माण करण्यासाठी ग्रामसेवकांनी काम करावे. प्रशिक्षण संस्थेने अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याबाबत नियोजन करावे. पंचायत राज निर्मिती करणे तसेच शासनाच्या इतर घटकावर काम करण्यासाठी राज्य नेहमीच अग्रेसर आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी  प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. काळभोर यांनी संस्थेचे कार्याविषयी माहिती दिली. सुरुवातीला संस्था व प्रशिक्षाणार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले.

Post a Comment

Previous Post Next Post