ठाणे गुन्हे शाखेने बनावट नोटा प्रकरणी मोठी कारवाई केली

 प्रेस मीडिया लाईव्ह :

सुनील पाटील :

पालघर: ठाणे गुन्हे शाखेने  बनावट नोटा प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख चौपाटी येथे पालघरच्या दोन व्यक्तींकडून तब्बल दोन हजार रुपयाच्या नोटांचे 400 बंडल असे एकूण आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात यश आले आहे.या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड गायमुख चौपाटी येथे दोन इसम इनोव्हा कारमधून बनावट भारतीय चलनी नोटा छापून त्याची विक्री करण्याकरता येणार असल्याची गुप्त माहीती ठाणे गुन्हे शाखा घटक 5चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ पथक तयार करून गायमुख चौपाटी येथे सापळा लावला. सकाळी 10.40 वाजायच्या सुमारास इनोव्हा कार क्र.एम.एच.04 डीबी 5411 मधून आलेल्या संशयित राम हरी शर्मा (वय 52 वर्षे) रा.विरार आणि राजेंद्र रघुनाथ राऊत (वय 58 वर्षे) रा.कुरगाव बोईसर या दोन इसमाना ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये दोन हजार रूपयाच्या वेगवेगळ्या नंबरच्या नोटा असलेले 400 बंडल, असे एकूण आठ कोटी रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा आढळून आल्या.

याबाबत ताब्यात घेतलेल्या दोन इसमांकडे चौकशी केली असता बनावट नोटा मदन चौहान याच्या मदतीने पालघर येथील गोडावूनमध्ये छापून त्या विक्री करता आणल्या असल्याचे आरोपींनी कबुल केले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 373/2022 भा.द.वि. कलम 489 (अ), 489 (ब), 489 (क), 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर हे करत आहेत. यातील बनावट नोटा या आरोपी राम हरी शर्मा याच्या पालघर येथील टेक इंडस्ट्रियल इस्टेटमधील गाळ्यामध्ये संगणक आणि प्रिंटरच्या सहाय्याने छापल्या असल्याची अधिक माहिती आरोपींकडून मिळाली असून ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post