सावित्रीबाई फुले विद्यापीठावर भाजपचा झेंडा

महाविकास आघाडी केवळ एकाच जागेवर विजय मिळवू शकली. 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अधिसभेच्या पदवीधर गटातील निवडणुका पार पडल्या . भारतीय जनता पक्षाने दहा पैकी नऊ जागा मिळवत आपले वर्चस्व राखले.तर महाविकास आघाडी केवळ एकाच जागेवर विजय मिळवू शकली. यंदा पहिल्यांदाच राजकीय पक्षांनी उघडपणे या निवडणुकीत पॅनेल करून उमेदवार उतरवल्याने या निवडणुकीला राजकीय स्वरुप प्राप्त झाले. त्यात भाजपशी संबंधितांचा विद्यापीठ विकास मंच, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले पॅनेल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेल, हिंदू महासभा आदी पक्ष-संघटनांचे एकूण ३७ उमेदवार होते. मंगळवारी रात्री उशीरा मतमोजणी संपली.


भारतीय जनता पक्षाशी संबंधितांच्या विद्यापीठ विकास मंचाने दहापैकी नऊ जागांवर विजय मिळवला. त्यात खुल्या गटात प्रसेनजित फडणवीस, सागर वैद्य, युवराज नरवडे, दादाभाऊ भिकाजी शिनलकर, अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे, भटक्या जाती प्रवर्गातून विजय सोनवणे, इतर मागास प्रवर्गातून सचिन गोरडे, अनुसूचित जमाती प्रवर्गातूनगणपत नांगरे, तर महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर यांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलच्या बाकेराव बस्ते या एकमेव उमेदवाराने विजय मिळवला. खुल्या प्रवर्गातील दोन जागांसाठी काहीशी चुरस झाल्याचे दिसून आले. मतमोजणीत दहाहून अधिक फेऱ्या झाल्या.

Post a Comment

Previous Post Next Post