पुणे महानगरपालिका कडून शासनाच्या जुन्या आदेशानुसार तीन सदस्यीय पद्धतीच्या निर्णया प्रमाणे प्रभाग रचना करण्याच्या कामास सुरूवातप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी राज्य शासनाने नव्याने प्रभाग करण्यासाठी दिलेल्या आदेशात स्पष्टता नसली तरी महानगरपालिका प्रशासनाकडून शासनाच्या जुन्या आदेशानुसार तीन सदस्यीय पद्धतीच्या निर्णया प्रमाणे प्रभाग रचना करण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे-भाजप सरकारकडून केवळ निवडणुकांसाठीची सदस्य संख्या कमी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निर्णयात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन कोणतेही आदेश शासन अथवा निवडणूक आयोगाकडून आलेले नसल्याने महापालिकेने जानेवारी 2022च्या आदेशानुसारच प्रभाग रचना करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

न्यायालयात मार्च 2022 मध्ये सुरू असलेल्या सुनावणीत ओबीसी आरक्षण मंजूर झालेले नव्हते. त्यामुळे, निवडणूक पुढे ढकलण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. तर राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने 2017 च्या निवडणूकीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, असा स्पष्ट आदेश असलेला कोणताही निर्णय महापालिकेस अद्याप मिळालेला नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता, त्यातच भरीस भर म्हणून शासनाचे नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश आल्यानंतर निवडणूक विभागाने आज तातडीने महापालिकांची ऑनलाइन बैठक बोलाविली होती. त्यामुळे या बैठकीत प्रभाग रचनेबाबतचा निर्णय स्पष्ट होईल, असे वाटत असतानाच या बैठकीत केवळ निवडणूक आयोगाच्या नवीन मतदार नोंदणी बाबत चर्चा झाली. त्यामुळे, प्रशासनाने आता तीन सदस्यीय संख्येनुसारच नव्याने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला. याबाबत आज शुक्रवारी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक होणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रभाग रचनेबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असली तरी, सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार राज्य शासनास असल्याने न्यायालयाने काहीही निर्णय दिला तरी महापालिकेस नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यात, प्रारूप प्रभाग रचना करणे, ती जाहीर करणे, त्यावर हरकती आणि सूचना मागविणे, आरक्षण सोडत, मतदार याद्या अंतीम करणे यासाठी किमान 60 ते 65 दिवसांचा कालावधी लागणार आहे. तर त्यानंतर निवडणूकांसाठी जो वेळ लागेल तो वेगळा असेल, यामुळे निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. यामुळे महापालिकेची निवडणूक मार्च महिन्याची सुरूवात किंवा एप्रिल महिन्याच्या मध्यास होऊ शकेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post