हिजाब गर्ल इन पुणे'...प्रश्नमंजुषा स्पर्धेचे पारितोषिक वितरण

 मुस्लीम मुलींनी शिक्षणात प्रगती करावी:बीबी मुस्कान खान


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :कोंढव्यातील अहद फाऊंडेशनने आयोजित केलेल्या 'महंमद सबके लिए' या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे पारितोषिक वितरण 'हिजाब गर्ल' म्हणून प्रसिद्ध झालेल्या बीबी मुस्कान खान(कर्नाटक)  यांच्या हस्ते झाले.अहद फाउंडेशन चे अध्यक्ष मज़हर मणियार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार, खासदार एड.वंदना चव्हाण,इस्लामचे अभ्यासक मौलाना अब्दुल रशीद मिफ्ताही ,   राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, मौलाना निजामुद्दीन,अबीद शाहबाद, इद्रीस कारी, मुफ्ती शाकीर खान  माजी नगरसेवक गफूर पठाण, नंदा लोणकर,  मुफ्ती रईस, मुफ्ती शाहीद,झाहीद भाई,अॅड. दिव्या चव्हाण, रईस सुंडके,हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. 



बीबी मुस्कान खान यांचा सत्कार यावेळी अहद फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला.

रविवार,दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी कोंढव्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (कोंढवा पोलीस स्टेशन समोर) येथे सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम झाला.अहद फाउंडेशन ने 'महंमद सबके लिए' ही प्रश्नमंजुषा स्पर्धा सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी घेतली होती. एक महिनाभर चाललेल्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेत १० हजार जण सहभागी झाले होते.

 मक्का-मदिना (उमराह) चा प्रवास हे पहिले पारितोषिक होते. इलेक्ट्रिक स्कुटर,लॅपटॉप,डेस्कटॉप कॉम्प्युटर,सायकल,घड्याळे,स्मार्ट बँड अशी पारितोषिके या कार्यक्रमात देण्यात आली. रविवारी झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी ५ हजार जण उपस्थित होते.

खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, 'घटनेने सर्वधर्मसमभावाचा संदेश दिलेला आहे. देशात सलोख्याचे वातावरण होते. २०१४ नंतर जातीय तेढ वाढविण्याचे काम केले जात आहे. परदेशातून उद्योग येत नाहीत. ट्रीपल तलाक नंतर  थेट कारावास होणे हे मानवी हक्काविरोधात आहे. नागरिकत्व कायद्याने मुस्लीम धर्माबाबत दुजाभाव केला. दुही पसरविणाऱ्यांना आगामी निवडणुकीत दूर ठेवले पाहिजे.महंमद पैगंबरांनी दिलेला शांततेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी अहद फाऊंडेशन चे कार्य प्रशंसनीय आहे '.

प्रशांत जगताप म्हणाले, ' अल्पसंख्य समुदायाने मतदार नोंदणी, मतदानात मागे राहता कामा नये. भाजपेतर पक्षाच्या जिंकणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे '.

डॉ.पी.ए. इनामदार म्हणाले, ' मुस्लीम समुदायाने शिक्षणाची कास धरावी.धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांनी जागतिक पातळीवरील अद्ययावत ज्ञान आपलेसे केले पाहिजे '

बीबी मुस्कान खान म्हणाल्या, 'आजच्या परिस्थितीत पैगंबरांची शिकवण महत्वपूर्ण आहे. त्यांनी महिलांना आदराचे स्थान दिले आहे. पालकांनी मुलींना  खूप शिकवले पाहिजे. शिकल्याशिवाय पुढे प्रगती करता येणार नाही. चांगल्या वाईटाची पारख करता येणार नाही. महिलांवर अल्लाहने मोठी जबाबदारी दिली आहे.ती पार पाडली पाहिजे. माझ्याकडून जे कार्य झाले आहे, ते अल्लाहचे कार्य आहे. माझे कौतुक हे अल्लाहचे कौतुक आहे. महंमद पैगंबर यांचे मानवतावादी  शिकवण पुढे नेण्याचे जे काम अहद फाऊंडेशन करीत आहे, ते कौतुकास्पद आहे.



Post a Comment

Previous Post Next Post