प्रवाशांना जलद वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेले कोणतेही बीआरटी मार्ग बंद करू नयेत,

पीएमपी प्रशासनाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  प्रवाशांना जलद वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेले कोणतेही बीआरटी मार्ग बंद करू नयेत, अशी मागणी पीएमपी प्रशासनाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

बीआरटी मार्ग बंद करण्याबाबत पोलीस आयुक्‍तांनी महापालिकेस पत्र दिल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बीआरटी मार्ग इतर वाहनांसाठी खुला करण्याची मागणी केली होती. त्यानंतर, महापालिकेने पीएमपी प्रशासनास पत्राद्वारे बीआरटी मार्ग बंद करण्याबाबत विचारणा केली होती. त्यावर हे मार्ग बंद करू नये, असे पत्र पीएमपीकडून आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे. मार्ग बंद करण्याऐवजी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एसटी बस, स्कूल बस, रुग्णवाहिका, अग्निशमक वाहनांना मार्गातून मुभा देण्यास हरकत नसल्याचे पत्रात म्हटले आहे.

शहरातील वाहतूक कोंडीवरून महापालिका आणि पोलीस प्रशासनात शीतयुद्ध सुरू आहे. ऐन दिवाळीत शहरात वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण झाल्याने पोलीस आणि महापालिकेस टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने शहरात वॉर्डन नेमले आहेत. तर पोलीस आयुक्‍तांनी 300 अतिरिक्त कर्मचारी नेमले आहेत. मात्र, त्या सोबतच महापालिका आयुक्तांनी वाहतूक पोलिसांनी गर्दीच्या वेळी कोंडी करण्यासाठी वाहतूक नियमन करावे तसेच अवजड वाहनांना शहरात बंदी घालावी, असे पत्र दिले. मात्र, पालिकेच्या या सल्ल्याने घायाळ झालेल्या पोलीस आयुक्तांनी महापालिकेने कोंडी फोडायची असेल, तर शहरातील बीआरटी मार्ग बंद करावेत, असा सल्ला महापालिकेस दिला.पोलिसांनी बीआरटीबाबत घेतलेल्या भूमिकेवरून शहरातील वाहतूक तज्ज्ञ, तसेच प्रवासी संघटनांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली असून बीआरटी मार्ग बंद केल्यास खासगी वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे पीएमपीला प्राथमिकता द्यावी, अशी मागणी या संघटनांच्या प्रतिनिधींककडून करण्यात आली आहे.

संजय शितोळे, सचिव, पीएमपी प्रवासी मंच ः बीआरटी हा प्रकल्पाचे सुरवातीपासूनच नियोजन फसले आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च करून आता बंद करण्याचा विचारच कसा करू शकतात. राजकीय उत्तरदायीत्व नाही, प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव, अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी आणि नागरिकांची उदासीनता यामुळे हे प्रकल्प बंद करण्याचा विचार सुरू आहे.

हर्षद अभ्यंकर, वाहतूक तज्ज्ञ ः पोलीस आयुक्तांना बीआरटी प्रकल्प काय आहे, हे आजिबात समजला नाही. त्यामुळे ते बीआरटी बंद करण्याची मागणी करत आहेत. प्राथमिकता पीएमपी बसला द्यायची की खासगी वाहनांना हे ठरविण्यात गफलत होत आहे. सार्वजनिक वाहतूक सुधारल्यास खासगी वाहने कमी होतील.

प्रांजली देशपांडे, वाहतूक तज्ज्ञ ः वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर सार्वजनीक वाहतूक सेवा सक्षम करणे आवश्‍यक आहे. बीआरटी मार्ग सुरू करण्यामागचा हेतूचा विसर आताच्या अधिकाऱ्यांना पडलेला दिसतो आहे. बीआरटी प्रकल्प सुरळीत करण्याऐवजी काढून टाकण्याचा निर्णय अव्यवहार्य आहे.

Post a Comment

Previous Post Next Post