तुम दंडे से तोडेंगे ,हम झंडे से जोडेंगे ' हा संकल्प घेऊन पुढे निघालेल्या भारत जोडो यात्रेत आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे..प्रा. योगेंद्र यादव

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी ता.२, भारतामध्ये गेल्या काही वर्षात महागाई बेरोजगारी यासारखे जीवन मरणाचे प्रश्न तीव्र होत आहेत. एकीकडे देशातील ९७% जनतेचे राहणीमान खालावत चालले आहे. त्यांची संपत्ती कमी होत आहे.तर दुसरीकडे सत्तेची कृपा असणारे गौतम अडाणी सारखे उद्योगपती अवघ्या अडीच वर्षात ६६ हजार कोटी वरून बारा लाख कोटींचे मालक बनतात. ही गरीब श्रीमंतीतील दरी भारत तोडण्याचे काम करत आहे.त्याच बरोबर देशांमध्ये जात्यंधत्ता ,धर्मांधता परधर्म याची पद्धतशीरपणे आग लावली जात आहे.त्याचवेळी भारत जोडो यात्रा ती आग विझवण्याचा काम करत आहे. ' तुम दंडे से तोडेंगे ,हम झंडे से जोडेंगे ' हा संकल्प घेऊन पुढे निघालेल्या भारत जोडो यात्रेत आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. कारण ही देश, संविधान ,माणूस वाचवणारी यात्रा आहे


असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राजकीय विश्लेषक प्रा. योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले. ते भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ नफरत छोडो संविधान बचाव संवाद मेळाव्यात समाजवादी प्रबोधिनीत बोलत होते.अध्यक्षस्थानी आमदार राजूबाबा आवळे होते.स्वागत व प्रास्ताविक इस्माईल समडोळे यांनी केले.मेळाव्यात आमदार राजुबाबा आवळे ,मदन कारंडे,शशांक बावचकर,नितीन जांभळे,राहुल खंजीरे यांनी मनोगते व्यक्त केले. मंचावर मिलिंद कोले,सौ. बेडगे, ललित बाबर ,सुभाष लोमटे, मानव कांबळे, शामराव नकाते आदी उपस्थित होते.

योगेंद्र यादव म्हणाले ,सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीच्या सर्व स्तंभांवरच कब्जा केलेला आहे .पण अंतिम शक्ती ही लोकांची शक्ती असते. आपले तोंड आणि आपले कान हेच सर्वात मोठे माध्यम आहे. ते माध्यम भारत जोडो यात्रेतून लोक वापरत आहेत. कारण जमिनीवरच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने लोक हैराण झालेले आहेत.लोक मन की बात ऐकून कंटाळले आहेत आता जन की बात बोलू लागले आहेत.कारण त्यांना जगतांना वेदना भोगाव्या  लागत आहेत. वेदनेचे नाते हे सर्वात गहिरे असते. देशाचा एक स्वतःभोवती फिरणारा रंगमंच बनवला गेला आहे. तिथे जे सादर होईल तेच देशाने निमूटपणे पहावे व ऐकावे असे त्यांना वाटत आहे .महागाई आणि बेरोजगारीसह अनेक तीव्र प्रश्न असताना त्याऐवजी शिवलिंग आणि कारंजा याची चर्चा होत आहे. 

योगेंद्र यादव पुढे म्हणाले भारत जोडो यात्रा ही रस्त्यावरून जाणारी यात्रा आहे. इतिहास पाहिला तर 'संसद चे सडक उंची है' हे सिद्ध झालेले आहे .आज देशात सण, कपडे यापासून देश हिंदू - मुसलमानात विभाजित केला जातोय.  चारशे रुपयांचा चा गॅस अकराशे रुपये झाला, शंभर रुपयाचे खाद्यतेल दोनशे रुपये झाले,सर्व बाबतीत महागाई वाढली, बेरोजगारी वाढत आहे. त्याची चर्चा होत नाही. संविधानिक मूल्यांवर हल्ले होत आहेत. अशावेळी आम्ही गांधीजींच्या बाजूचे की गोडसेच्या बाजूचे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे.देश जळत असताना तुम्ही काय करत होता ?हे पुढच्या पिढ्यांनी आपल्याला विचारायचे नसेल तर आपण या यात्रेत सहभागी झालं पाहिजे. या यात्रेची प्रथम खिल्ली उडवणारे आता मुस्लिमांशी चर्चा करत आहेत.बेरोजगारीवर स्वतः बोलत आहेत. हे या यात्रेचे यश आहे.योगेंद्र यादव यांनी आपल्या एक तासाच्या सविस्तर भाषणामध्ये आज देशापुढे असलेली आव्हाने, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली  भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने तिरंग्याखाली एकत्र आलेले विविध राजकीय पक्ष व जनसंघटना यांची भूमिका सविस्तरपणे मांडली.

या मेळाव्यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून समाजवादी प्रबोधिनी पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी पथनाट्य व गीत सादर केले.या मेळाव्यात व पद यात्रेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ),स्वराज इंडिया, स्वाभिमानी पक्ष,जनता दल (धर्मनिरपेक्ष ),लाल निशाण पक्ष,सोशलिस्ट पार्टी,भारतीय कम्युनिस्ट पक्ष ,शेतकरी कामगार पक्ष,समाजवादी प्रबोधिनी,राष्ट्र सेवा दल,संविधान परिवार,सामाजिक परिवर्तन परिषद,विवेक वाहिनी, छात्र भारती आदी विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते व संविधान प्रेमी नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post