कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे २ महिन्यांचे थकलेले वेतन आज संध्याकाळ पर्यंत देणार - आपच्या शिष्ट मंडळाला आयुक्तांचे आश्वासन

प्रसादाची पर्वा न करता क्रिस्टल कंपनीचे लाड थांबवा, काळया यादीत टाका

मनपातील सर्व ७००० ते ८००० कंत्राटी कामगारांना नियमानुसार बोनस, रजा वेतन व घरभाडे भत्ता द्या - आपची मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे महानगरपालिकेतील १६०० सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना त्यांचे थकलेले दोन महिन्यांचे वेतन तातडीने द्यावे तसेच पुणे मनपाच्या सेवेतील कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवणाऱ्या KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED कंपनीवर दंडात्मक कारवाई करत काळया यादीत टाकावे यासाठी आज आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्या कार्यालयात धडक भेट घेतली. या शिष्टमंडळाशी चर्चा करताना आयुक्तांनी आज संध्याकाळपर्यंत थकीत वेतन दिले जाईल असे आश्वासन आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले. 

पुणे महानगरपालिकेच्या सेवेतील १६०० कंत्राटी सुरक्षारक्षकांचे ऑगस्ट, सप्टेंबर २०२२ या दोन महिन्यांचे वेतन क्रिस्टल कंपनीद्वारे थकीत झाले आहे. ही अतिशय गंभीर बाब असून सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल सुरु आहेत. कुटुंब कसे चालवावे हा प्रश्न कामगारांपुढे आहे. दिवाळी सण कसा साजरा करायचा हा यक्ष प्रश्न या कामगारांपुढे आहे. केलेल्या कामाचे वेतन न देणे हा फौजदारी गुन्हा आहे. तसेच ठेकेदाराने कामगारांचे वेतन दिले की नाही हे तपासणे आणि दिले नसल्यास त्यांना द्यायला लावणे व कामगार हिताच्या तरतुदीला हरताळ फासणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करणे ही पुणे  महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.

भाजपचे विधान परिषदेतील सर्वात श्रीमंत आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED या कंपनीवर सत्ताधारी भाजप- शिंदे सरकारचा राजकीय वरदहस्त असल्याने तिच्या विरोधात अद्यापही कोणतीही प्रशासकीय व फौजदारी कारवाई होत नाही. तिचे लाड केले जात आहेत. या कंपनीला काळ्या यादीत टाकावे असा अहवाल कामगार कल्याण विभाग व सुरक्षारक्षक विभागाने दिलेला आहे अशी आमची माहिती असून पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार हे राजकीय दबावापोटी कोणतीही कारवाई करत नाहीत. याबाबत आयुक्तांनी कोणत्याही प्रसादाची पर्वा न करता लाड थांबवत या कंपनीला काळया यादीत टाकावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी आपच्या शिष्टमंडळाला आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले. 

पुणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये सुमारे सात ते आठ हजार कंत्राटी कामगार ठेकेदारांमार्फत काम करत आहेत. बोनस प्रधान अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार कंत्राटी कामगारांचे मूळ वेतन अधिक विशेष भत्ता मिळून येणारे रक्कम दरमहा रुपये 21000 पेक्षा कमी असल्यास आणि वर्षातील 30 दिवसांपेक्षा जास्त काळ कंत्राटी कामगारांची सेवा घेतली असल्यास त्याला मूळ वेतन अधिक विशेष भत्ता मिळून येणाऱ्या रकमेच्या 8.33% बोनस देणे बंधनकारक आहे. परंतु पुणे महानगरपालिका कामगार कायद्यांचे उल्लंघन करत 17 फेब्रुवारी 2021 रोजी कार्यालयीन आदेश काढत कंत्राटी कामगारांना 8.33% बोनस, 5% घर भाडे व 5% रजावेतन देणे बंद केले आहे. हा आदेश कायद्याच्या कसोटीवर योग्य नाही हे आपचे प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. पुणे महानगरपालिकेतील कामगार विभाग अशा पद्धतीने कंत्राटी कामगारांच्या हक्कांची पायमल्ली करत आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे केले जाणाऱ्या या शोषणाला कोणत्याही पद्धतीने कायद्याचा आधार नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांचे साधारणपणे सुमारे 4000 ते 4500 रुपयांचे दरमहा नुकसान होत आहे. अशा पद्धतीने गेल्या 22 महिन्यांमध्ये पुणे महानगरपालिकेने कंत्राटी कामगारांचे सुमारे 70 ते 75 कोटी रुपये बुडवले आहेत. याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले आहे. वर्ष 2021 अगोदर पुणे महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगारांच्या वेतनासोबत वरील बोनस, घरभाडे व रजावेतन सुद्धा दिले जात होते. पुणे शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा कंत्राटी कामगारांना वर उल्लेख केल्याप्रमाणे बोनस, घरभाडे व रजावेतन दिले जात आहे. तरी पुण्यातही ते दिले जावे अशी मागणी आप तर्फे डॉ अभिजीत मोरे यांनी केली. बोनस मिळाला असता तर कंत्राटी कामगारांची दिवाळी देखील गोड झाली असती अशी गोष्टी आम आदमी पक्षाचे श्रीकांत आचार्य यांनी केली. 

आजच्या शिष्टमंडळामध्ये राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे, राज्य वाहतूक विंग अध्यक्ष श्रीकांत आचार्य, किरण कद्रे, किशोर मुजुमदार, फॅबियन सॅमसन, आबासाहेब कांबळे, साजिद खान, सुरेखा भोसले, निलेश वांजळे, अनिल कोंढाळकर हे उपस्थित होते. याशिवाय आपचे सुजित अगरवाल, संजय कोने, शेखर ढगे, सर्फराज शेख, तानाजी शेरखाने, हर्षल भोसले, रविराज डोंगरे, कुमार धोंगडे, शिवाजी डोलारे, संजय कटरनवरे यांसह अनेकजण उपस्थित होते. 
Post a Comment

Previous Post Next Post