सहाय्यक लेखाधिकारी तीन हजाराची लाच घेताना जाळ्यात अडकला..



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :


कोल्हापूर : रस्ता आणि आरसीसी गटार कामाची फाईल पुढील कारवाईसाठी विना त्रुटी पाठवण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पन्हाळा पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जाळ्यात पकडले. अरुण रघुनाथ मांगलेकर ( वय 55, सहाय्यक लेखाधिकारी, पंचायत समिती, पन्हाळा, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, रा. प्लॉट नं. 6 व 7, मनोरमानगर, देवकर पाणंद, कोल्हापूर) असे लाच घेणारे अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली.

 तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांनी पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील रस्त्याचे तीन लाखाचे काम केले आहे. तसेच पन्हाळा तालुक्यातील मौजे आरळे येथील आरसीसी गटरचे तीन लाखाचे काम केले आहे. तक्रारदाराने या दोन्ही कामाच्या बिलाची फाईल व रक्कम मिळवण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला होत. समितीतील सहाय्यक लेखा अधिकारी अरुण मांगलेकर यांनी विना त्रुटी दोन्ही फाईल कार्यवाहीसाठी पाठवण्यासाठी तीन हजार रुपये यांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने 4 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. आज दुपारी पन्हाळा पंचायत समितीच्या कार्यालयात तीन हजार रुपयांची लाच घेताना सहाय्यक लेखाधिकारी अरुण मांगलेकर यांना पोलिसांनी जाळ्यात पकडले.
 पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोसई संजीव बंबरगेकर, पोहेकॉ शरद पोरे, पोना सुनील घोसाळकर, पोकॉ रुपेश माने, मयूर देसाई, हेकॉ विष्णू गुरव कारवाईत भाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post