फाइव्ह जी अपग्रेड करण्याच्या नावाखाली मेसेज करून नागरिकांची फसवणूक

फसव्या मेसेज पासून सावध राहावे, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पिंपरी : तुमचा मोबाइल फोन फोरजी मधून फाइव्हजी मध्ये अपग्रेड करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्‍लिक करा अथवा नंबर वर फोन करा, असे मेसेज मध्ये सध्या अनेकांना येत आहेत. या लिंकच्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे, नागरिकांनी अशा फसव्या मेसेजपासून सावध राहावे, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे.

नुकतीच देशात फाइव्ह जी नेटवर्कची सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते झाली आहे. फाइव्ह जी मध्ये इंटरनेटला भरपूर स्पीड मिळणार आहे. त्यामुळे अनेकांचे फाइव्ह जीकडे विशेष लक्ष आहे. त्याचाच आधार घेत सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा पॅटर्न शोधला आहे. फाइव्ह जी अपग्रेड करण्याच्या नावाखाली मेसेज करून नागरिकांची फसवणूक केली जाते. अशा मेसेजमधील लिंकवर क्‍लिक करू नये. मेसेज कोणत्या क्रमांकावरून आला आहे, त्याचा सोर्स काय आहे, याची माहिती घेऊन त्याची खात्री करावी. मोबाईल कंपन्या अशा प्रकारचे मेसेज पाठवत नाही. मोबाईल फोन बनवतानाच तो विशिष्ट जनरेशनचा बनवला जातो. पाईव्ह जनरेशन सपोर्ट करणारा मोबाईल असेल तर संबंधित मोबाइल धारकांना अपग्रेड करण्याची आवश्‍यकता नसते. मात्र ही माहिती नसल्याने अनेकजण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात.

तुमच्या मोबाइल मधील फोर जी प्रणाली अपग्रेड करून फाइव्ह जी करून घ्या. त्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्‍लिक करून पुढील प्रोसेस पूर्ण करा. अथवा सोबत दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून माहिती जाणून घ्या, अशा आशयाचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर एखादी लिंक तसेच फोन नंबर देखील दिला जातो. नागरिकांनी संबंधित लिंकवर मोबाइल अपग्रेड करण्यासाठी क्‍लिक केल्यास त्यावर बॅंकेशी संबंधित माहिती विचारली जाते. त्या आधारे नागरिकांच्या बॅंक खात्यावर डल्ला मारला जातो. फसवणुकीचा हा नवा पॅटर्न सायबर गुन्हेगारांनी शोधला आहे.

मेसेजच्या सोर्सची खात्री करा. मेसेज कोणी पाठवला आहे, याची माहिती घ्यायला हवी. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्‍वास ठेऊ नये.  – संजय तुंगार, वरिष्ठ, पोलीस निरीक्षक सायबर सेल

Post a Comment

Previous Post Next Post