कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार पालकमंत्री दिपक केसरकर

 कोल्हापूर शहराचा 'हेरिटेज सिटी' म्हणून विकास साधण्यावर भर


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर  (जिमाका)  : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही देऊन जयपूर सिटीच्या धर्तीवर कोल्हापूर शहराचा 'हेरिटेज सिटी' म्हणून विकास साधण्यावर भर देण्यात येईल, असा विश्वास कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाबाबत पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील खासदार, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य कृषी, शिक्षण व  संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबीटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी पालकमंत्री तथा आमदार सतेज पाटील, आमदार सर्वश्री जयंत आसगावकर, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, राजूबाबा आवळे,  ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दिपक केसरकर म्हणाले, कोल्हापूर हा नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण जिल्हा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा संदेश देत कृषी, उद्योग, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून कोल्हापूरचा विकास साधला आहे. या धर्तीवर जिल्ह्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील. जुना राजवाडा, शालिनी पॅलेससह शहरातील मुख्य रस्त्यांलगतच्या हेरिटेज वास्तूंचे जतन होण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती व विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. शाहू मिलचा विकास, पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगून पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, राधानगरी धरण, दाजीपूर अभयारण्य, पर्यटन क्षेत्र, कृषी, उद्योग, कला, क्रीडा,  सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील. 

दसरा महोत्सवासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 25 लाखांचा निधी

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव देश विदेशात पोहोचण्यासाठी हा महोत्सव भव्य सोहळा (ग्रँड इव्हेंट) म्हणून साजरा करण्यात येईल, यात राज्य शासन सहभागी होईल, असे सांगून यावर्षीच्या दसरा महोत्सवासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडीक, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक उद्योग, उड्डाणपूल, प्रदुषण नियंत्रण, रस्ते विकास, ग्राम विकास, पार्कींग व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन अशा विविध बाबींविषयी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याशी चर्चा केली.  


Post a Comment

Previous Post Next Post