शाही दसरा महोत्सवातून सामाजिक समतेच्या संदेशाचा प्रसार व्हावा -शाहू महाराज छत्रपती

  शाही लवाजम्यासह राजेशाही थाटात होणार यंदाचा दसरा महोत्सव.. 


प्रेस मीडिया लाईव्ह :

   कोल्हापूर, दि. 2 (जिमाका): यावर्षी भव्य स्वरुपात साजऱ्या होणाऱ्या कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातून राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या सामाजिक समतेच्या संदेशाचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा श्री शाहू महाराज छत्रपती यांनी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली.

        शाही दसरा महोत्सवाच्या आयोजनाबाबत न्यू पॅलेस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, दसरा महोत्सव समिती सदस्य आदी उपस्थित होते.

        श्री शाहू महाराज छत्रपती म्हणाले, प्रशासनाच्या सहयोगाने यावर्षी साजरा करण्यात येणाऱ्या शाही दसरा महोत्सवात अधिकाधिक नागरिक सहभागी होतील या दृष्टिने नियोजन करावे. या महोत्सवात विविध घटकांना सामाविष्ट करुन घेवून या महोत्सवाला शाहूकालीन महोत्सवाचे स्वरुप प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत. 

       पालकमंत्री दिपक केसरकर म्हणाले, कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा, कार्यकर्तृत्वाचा, राजघराण्याचा, विविध पारंपरिक लोककलांचा वारसा आहे. कोल्हापूरचा दसरा महोत्सव घोडे, उंट, मर्दानी खेळ, पोवाडा, कुस्ती प्रात्यक्षिके, पारंपंरिक वेषभूषा अशा शाही लवाजम्यासह राजेशाही थाटात साजरा करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. दरवर्षी होणाऱ्या राजेशाही दसरा महोत्सवामध्ये बदल न करता हा महोत्सव लोकसहभागातून अधिक व्यापक आणि अधिक भव्य स्वरुपात साजरा करण्यावर राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. यावर्षीचा दसरा महोत्सव थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सांगून पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. 

       या महोत्सवात शाहूकालीन विविध मर्दानी खेळ, कलांचे सादरीकरण व्हावे, अशी अपेक्षा संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.

       कोल्हापूरचा दसरा महोत्सव भविष्यात देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याबाबत मालोजीराजे छत्रपती यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

       जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या तयारीबाबत माहिती दिली.        

       या महोत्सवात महिला बचत गटांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात येत असल्याबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले. या महोत्सवासाठी नागरिकांचा प्रतिसाद पाहता वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post