गांधीजींना शेवटच्या माणसाचे उत्थान अभिप्रेत होते .... ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे यांचे मत
प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.२गांधींजीनी सर्वप्रथम भारत काय आहे हे प्रत्यक्षपणे फिरून समजून घेतले. त्यानंतर व्यापक जनजागरण करून निरनिराळी आंदोलने करून ब्रिटिशांना जेरीस आणले.भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची अखेरची तीस वर्षे त्यांनी नेतृत्व केले.स्वातंत्र्यानंतर नवस्वतंत्र भारताची उभारणी प्रागतिक दृष्टिकोन असणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे करतील याची त्यांना खात्री होती. सत्य,अहिंसा,लोकशाही ,सर्वधर्मसमभाव, समाजातील शेवटच्या माणसाचे उत्थान अशा आधुनिक काळातील प्रागतिक मूल्यांवर देशाची वाटचाल झाली पाहिजे अशी गांधीजींची धारणा होती. स्वातंत्र्योत्तर भारताबाबतचा त्यांचा तोच दृष्टिकोन होता ,असे मत ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ' गांधीजींची स्वातंत्र्योत्तर भारताची संकल्पना ' 'या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी सोमनाथ रसाळ होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा. रमेश लवटे यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

दयानंद लिपारे म्हणाले, गांधीजींनी व्यक्ती आणि राष्ट्राच्या जीवनातल्या सर्व महत्त्वाच्या बाबींवर मूलभूत स्वरूपाचा विचार केलेला होता. शिक्षणापासून पर्यावरणापर्यंत आणि धर्मापासून राजकारणापर्यंत सर्व बाबीतून समाजातल्या शेवटच्या माणसाची उन्नती झाली पाहिजे ही त्यांची भूमिका होती. साध्य आणि साधन विवेक तसेच दर्जा व संधीच्या समानतेतूनच राष्ट्र उभारणी होऊ शकते .त्याआधारे स्वतंत्र भारताची वाटचाल व्हावी ही गांधीजींची संकल्पना होती. लिपारे यांनी आपल्या मांडणी मधून गांधीजींच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन त्यांना कशा प्रकारचा स्वातंत्र भारत अभिप्रेत होता आणि आज काय चालले आहे याचा अभ्यासपूर्ण उहापोह केला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना सोमनाथ रसाळे म्हणाले, गांधीजींसारखं व्यक्तीत्व सहस्त्रकातून एखाद जन्मत असतं. गांधीजींचे सर्व विचार आत्मसात करणे व आजच्या काळात ते अवलंबणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. मात्र समाज जीवनात व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर कार्यरत असताना साध्या- साध्या गोष्टींमधून आपण गांधी विचार पेरू शकतो.ते पेरण्याची आज नितांत गरज आहे. त्याची सुरुवात स्वतःपासून व स्वतःच्या कुटुंबापासून केली पाहिजे.' आधी केले मग सांगितले' अशा पद्धतीने गांधीजींनी उक्ती आणि कृती यात एकवाक्यता साधली होती. आपणही ती साधणे हा गांधीविचार पुढे नेण्याचा मार्ग आहे.

या कार्यक्रमास प्रसाद कुलकर्णी ,शशांक बावचकर, प्रा.रमेश लवटे,तुकाराम अपराध, अन्वर पटेल ,धोंडीबा कुंभार ,नारायण लोटके, महालींग कोळेकर ,पांडुरंग पिसे ,अशोक केसरकर, शकील मुल्ला, देवदत्त कुंभार, रामदास कोळी, रामचंद्र ठिकणे, सुनील बारवाडे, शहाजी धस्ते,नाथा गळवे ,अशोक माने, मनोहर जोशी,आनंद जाधव आदी उपस्थित होते.अन्वर पटेल यांनी आभार मानले.
Post a Comment

Previous Post Next Post