लंपी रोगावरील लस खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ५० लाखाचा निधी

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पुणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुणे यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून औषधे व लस खरेदीसाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे ५० लाखाच्या खर्चास जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ.राजेश देशमुख यांनी मान्यता दिली आहे.

लंपी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. विशेषत: लसीकरणावर भर देण्यात आला आहे. लंपी रोगाचा संसर्ग झालेल्या पशुधनाला इतर जनावरांपासून वेगळे ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या उपचारासाठी पुरेशी औषधे आणि लसमात्रादेखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या खर्चास तातडीने मान्यता दिली आहे. 

लंपी नियंत्रणासाठी आवश्यकता असल्यास अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र किंवा राज्य शासनाकडून लंपी आजारावरील लशीसाठी निधी उपलब्ध झाल्यास हा निधी प्राधान्याने औषधांसाठी वापरण्यात यावा, असेही मंजूरी आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात लसीकरणाला वेग

जिल्ह्यात १२ तालुक्यातील ७६ ठिकाणी पशुधनाला लंपीचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. ३०६ जनावरांना लंपीचा संसर्ग झाला असून त्यापैकी ८ जनावरांचा मृत्यू झाला आहे आणि १७७ सक्रीय असून १२१ बरे झाले आहेत. हा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधित जनावरांवर औषधोपचार करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. त्यासाठी २ लाख ८५ हजार ७०० लसमात्रा उपलब्ध झाल्या आहेत. जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीतही याबाबत आढावा घेण्यात आला आहे.

बाधित जनावरे आढळलेल्या गोठ्यापासून ५ किलोमीटर परिसरातील सर्व पशुधनाचे तातडीने लसीकरण करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्यानुसार मोहिम स्तरावर हे काम करण्यात येत आहे. निगराणी क्षेत्रातील सुमारे ४ लाख ४०  जनावरांचे लसीकरण करावयाचे असून त्यापैकी १ लाख ५५ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. बाधित जनावरे आढळलेल्या भागापासून ५ किलोमीटरच्या क्षेत्रातील सर्व पशुधनावर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाची एकूण २९० पथके नेमण्यात आले असून त्यासाठी ७३० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिंग व्हॅक्सिनेशन

लंपी संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लसीकरण पद्धतीला ‘रिंग व्हॅक्सिनेशन’असे म्हणतात. यात बाधित जनावराचे ठिकाण किंवा गोठा केंद्र मानून ५ किलोमीटरच्या परिघाच्या भागातील लसीकरण आधी करण्यात येते आणि तेथून सुरूवात करीत बाधित भागाकडे जात जनावरांचे लसीकरण करण्यात येते. त्यामुळे संसर्गाची तीव्रता कमी करण्यास मदत होते असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शितलकुमार मुकणे यांनी सांगितले.

0000

Post a Comment

Previous Post Next Post