चार हजार मुलांना चष्मा , जिल्हा परिषदेकडून या सर्व विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार

 प्रेस मीडिया लाईव्ह :

मौलाना सादिक मजाहिरी : 

पुणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील 2 लाख 249 शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील 4 हजार 139 मुलांना डोळ्यांचा त्रास असून, त्यांना चष्म्याची आवश्‍यकता असल्याचे आढळून आले.वेळीच चष्मा लावल्यामुळे पुढील नंबर वाढण्याचा धोका टळू शकतो. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून या सर्व विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

बदलेली जीवनशैली, त्यामध्ये पौष्टिक आहाराचा अभाव आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाइलच्या आहारी गेलेली मुले, त्यात ऑनलाइन शिक्षण यामुळे मुलांच्या डोळ्याच्या तक्रारी वाढल्या आहेत; परंतु ग्रामीण भागात त्याबाबत फारशी जनजागृती नसल्यामुळे डोळ्यांच्या तक्रारी आल्या तरी त्याची तपासणी केली जात नाही. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तालुकानिहाय डोळे तपासणी शिबिर घेतले. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 3 हजार 638 शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील दोन लाख 249 मुलांची डोळे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 4 हजार 139 मुलांना डोळ्याचे त्रास असून, त्यांना चष्मा लागल्याची माहिती समोर आली. धक्कादायक म्हणजे काही मुलांना तर अधिक नंबर असलेला चष्मा असल्याचे निदर्शनास आले.

Post a Comment

Previous Post Next Post