इचलकरंजीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन

 रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक ठप्प ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना वेतन, ग्रॅच्युईटी व पेन्शन मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने येथील प्रांत कार्यालय चौकात रास्ता रोको करत जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी १४५ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहून ते आता गंभीर झाले आहेत. महागाईने कर्मचारी त्रस्त झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचारी वेतनी आहेत, असा निर्णय दिला आहे. मात्र, त्यांचे वेतन निर्धारित करणे, महागाई भत्ता लागू करणे, आदी प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या हक्कासाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने

जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून आज इचलकरंजी शहरातील प्रांत कार्यालय चौकातही इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या सेविका व मदतनीसांतर्फे रास्ता रोको करत जेल भरो आंदोलन करण्यात आले. तसेच सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना वेतन लागू करा. मिनी अंगणवाडी सेविकेचे वेतन अंगणवाडी सेविकेएवढे असलेच पाहिजे. मदतनीसांचे वेतन सेविका वेतनाच्या ७५ टक्के पेक्षा कमी नको,  महागाई च्या प्रमाणात महागाई भत्ता द्या, सर्व सेविका मदतनीसना घरभाडे भत्ता द्या, मानधनाच्या निम्मी पेन्शन, ग्रॅच्युईटी मिळालीच पाहिजे,  नवे मोबाईल घेण्यासाठी पैसे द्या, पोषण ट्रॅकर मराठीत द्या, रिचार्जचे पूर्ण पैसे द्या, इंधन दर वाढवून द्या. चांगला आहार द्या, यासह विविध मागण्या करत त्याचे निवेदन प्रांत कार्यालयास सादर करण्यात आले.सदरचे निवेदन शिरस्तेदार संजय काटकर यांनी स्विकारले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे धोंडीबा कुंभार, सुनील बारवाडे, अक्काताई उदगावे, महादेवी खोत, सुप्रिया नेने, ज्योती हजारे, उज्वला तोडकर, सुजाता गायकवाड, सरिता कोकणे, सविता बडवे, सुशीला आवळे, उमा बनगे, रेखा कांबळे, नम्रता कुरणे यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post