सत्यधर्म व सेवाभाव जोपासण्याची गरज..प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता. २४ आज सर्व क्षेत्रात सत्यशोधनाची नितांत गरज आहे. सत्यधर्म आणि सेवाभाव यांच्या जोपसनेतुनच आपली वाटचाल संपन्न व सुदृढ होऊ शकेल. शिक्षणामुळे समाज केवळ सुशिक्षित नव्हे तर सुसंस्कृत झाला पाहिजे या भूमिकेतून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. 'सारे अनर्थ एका अविद्येने केले ' हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा अखंड ध्यानात घेऊन सत्यशोधक समाजाच्या बैठकीतूनच रयतची स्थापना झाली. गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे प्रशिक्षित शिक्षक ही कर्मवीरांची धारणा होती. स्वावलंबी शिक्षण आणि श्रमाला प्रतिष्ठा हा त्यांच्या शैक्षणिक भूमिकेचा गाभा घटक होता. 

स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य याची शिकवण देणाऱ्या सत्यशोधक समाजाच्या विचारांची ,कर्मवीर अण्णांच्या जीवन संदेशाची आणि राष्ट्रीय सेवा योजना दिनाची भूमिका समजून घेऊन जर आपण प्रयत्नपूर्वक वाटचाल केली तर आणखी पंचवीस वर्षानी स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सव साजरा करत असताना आपला देश सर्वार्थाने संपन्न झालेला असेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते श्री.ना.बा. एज्युकेशन सोसायटीच्या श्री व्यंकटेश महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत आयोजित  ' कर्मवीर भाऊराव पाटील जयंती आणि राष्ट्रीय सेवा योजना दिवस ' या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.व्ही.ए.माने होते. मंचावर उपप्राचार्य डॉ. एन.एम. मुजावर, प्रा.ए.आय.बाणदार यांची उपस्थिती होती. 

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्राचार्य डॉ.व्ही.ए.माने यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य,राष्ट्रीय सेवा योजनेमागील राष्ट्रनिर्माणाची भूमिका यांचा उहापोह केला. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या सविस्तर भाषणात या विषयाची व त्याच्या समकालीन महत्वाची सखोल मांडणी केली.प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. डी.एस.कांबळे यांनी करून दिला. आभार प्रा.एस.बी.मलघाण यांनी मानले.सना मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post