भारत जोडो यात्रेकडे राज्यशास्त्रीय व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पहावे लागेल

समाजवादी प्रबोधिनीच्या चर्चासत्रातील मत


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता. २५, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते श्रीनगर ही बारा राज्ये, पाच महिने,छत्तीसशे किलोमीटर अंतर पायी सुरू राहणाऱ्या भारत जोडो यात्रेला पहिल्या पंधरा दिवसातच जो लोक पाठिंबा मिळत आहे तो निश्चितच स्पृहणीय आहे. अर्थात या अभियानाचा अजून नव्वद टक्के भाग शिल्लक असतांना तिच्या यशपयशाची चर्चा करता येणार नाही. पण जनता, महागाई, बेरोजगारी, राजकीय केंद्रीकरण, भीती ,कट्टरता, द्वेष या साऱ्यावर बोलू इच्छित आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही.जनतेला बोलकं करणं आणि आपण भयमुक्तपणे बोलू शकतो हा जनतेला विश्वास देणं फार महत्वाचे आहे. भारत जोडो यात्रेकडे राज्यशास्त्रीय व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून एक अभ्यास  म्हणून बारकाईने पाहावे लागेल असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. ' भारत जोडो यात्रा व भारतीय राजकारण ' हा चर्चासत्राचा विषय होता.

या चर्चेत असे मत व्यक्त करण्यात आले की,पक्षीय राजकारण ,बांधणी व पुनर्बांधणी करण्याचा प्रत्येक राजकीय पक्षालाच अधिकार आहे. कोणी घोषणा केली म्हणून अमुक मुक्त भारत, प्रमुख मुक्त भारत होत नसतो. तर भारत  लोकशाही पासून धर्मनिरपेक्षतेपर्यंतच्या सर्व संवैधानिक मूल्यांनी युक्त असलेला देश आहे.जनतेच्या नेमक्या प्रश्नांवर,जमिनीवरील बाबींवर जनतेला बोलते करणे आणि नेते मंडळीनी ते ऐकणे फार शहाणपणाच आणि महत्त्वाचं असतं.अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून सर्वच घटनात्मक मूल्यांची गळचेपी होत असताना ,सत्तेला विरोध म्हणजे राष्ट्रद्रोह अशी अत्यंत विकृत व्याख्या केली जात असताना सुरू असलेली ही भारत जोडो यात्रा व तिला मिळत असलेला लोकपाठिंबा निश्चितच महत्वाचा आहे.हे या यात्रेतून घडत आहे याला मोठा राजकीय अनव्यार्थ आहे.तो सुदृढ राजकीय भूमिकेतून समजून घेतला पाहिजे. या यात्रेचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सर्व अंगांनी बारकाईने केलेला अभ्यास झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने भारताचा शोध घेण्यासाठी तो उपयुक्त ठरेल. या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षाचे राजकारण, विरोधी पक्षांचे राजकारण ,प्रादेशिक पक्षांचे राजकारण आणि अर्थातच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे राजकारण आदी मुद्द्यांचीही सखोल चर्चा झाली.

या चर्चेमध्ये प्रसाद कुलकर्णी, तुकाराम अपराध, दयानंद लिपारे,पांडुरंग पिसे,सोमनाथ रसाळ, महालिंग कोळेकर, रामभाऊ ठिकणे, डी.एस.डोणे,शकील मुल्ला, सचिन पाटोळे ,देवदत्त कुंभार, शहाजी धस्ते, मनोहर जोशी,अशोक माने आदींनी सहभाग घेतला. यावेळी समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांचा वाढदिवसानिमित्त  आणि समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांचा दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ ठिकणे यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post