पनवेल मनपातील भाजपच्या माजी नगरसेवकांचा मनमानी कारभार संपणार तरी कधी?

 पनवेल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील यांची पनवेल मनपा आयुक्तांकडे बैठकीसाठी दालनाची मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील :

   नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी पनवेल महापालिका कार्यालयात बैठक घेण्यास परवानगी मिळण्याची मागणी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित पां. पाटील यांनी आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबत अभिजित पाटील यांनी आयुक्तांना लेखी पत्रही दिले आहे. दिनांक ०९ जुलै २०२२ रोजी पनवेल महापालिकेतील नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला असून देखील भाजपचे माजी नगरसेवक महापालिका कार्यालयात जर बैठका घेत असतील; तर नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्हाला देखील बैठक घेण्यास महापालिकेने परवानगी द्यावी, असा आक्रमक पवित्रा अभिजित पाटील यांनी घेतला आहे.

          दिनांक ०९ जुलै २०२२ रोजी पनवेल महानगरपालिकेच्या  नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे. या धर्तीवर पनवेल महानगरपालिकेचे नाव व मुद्रा असलेले लेटरहेड, नामफलक, वाहनांवरील नगरसेवक पदाचे नामफलक, नगरसेवक ओळखपत्रे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून देण्यात आलेले शिक्के तसेच तत्सम कागदपत्रे सचिव कार्यालयात जमा करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी दिले आहेत. पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे काही माजी नगरसेवक अद्यापही विद्यमान नगरसेवक म्हणून वावरताना दिसून येत आहेत. काही जणांच्या वाहनांवरील नगरसेवक पदाच्या पाट्या तर अद्यापही उतरलेल्या नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे नगरसेवक पदाचे अधिकार संपुष्टात येऊन देखील काही नगरसेवक विद्यमान नगरसेवकाप्रमाणे महापालिका कार्यालयात कोणत्या संविधानिक अधिकाराने बैठका घेत आहेत? असा खडा सवालही अभिजीत पाटील यांनी आयुक्तांना केला आहे.

          अभिजीत पाटील यांनी याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, महानगरपालिकेतील सत्ताधारी राजवट संपल्यामुळे महापालिकेचे प्रशासक आयुक्त म्हणून तुम्ही काम पहात आहात. मात्र अद्यापही महापालिका क्षेत्रात अनेक माजी नगरसेवक हे नगरसेवक म्हणूनच वावरत आहेत. त्यांच्या वाहनांवरील फलक/स्टिकर काढलेले नाहीत. प्रशासक पदाच्या अधिकाराने आपण सर्व पक्षाच्या माजी लोकप्रतिनिधींना याबाबत पत्र देवून महापालिकेचे लेटरहेड, विशेष कार्यकारी अधिकारीपदाचे शिक्के, व्हिजिटींग कार्ड जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तुमच्या आदेशाचे पालन किती नगरसेवकांनी केले याची कल्पना आम्हाला नाही. अद्यापही महापालिकेतील काही माजी नगरसेवकांना अद्यापही सत्ता असल्याचा भास होत असून महापालिका इमारतीतील दालनात माजी नगरसेवकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजपाचे नेते बैठका घेत आहेत.

          भाजपाच्या नेत्यांना महापालिकेत बैठका, सभा घेण्याचे अधिकारी असतील तर नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्हाला देखील महापालिकेत बैठक घेवून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण परवानगी द्यावी. नव्या महापालिकेचा कारभार अत्यंत उत्तम पध्दतीने सांभाळणारे आयुक्त म्हणून तुमची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नावर सदैव तप्तर असलेले तुम्ही आम्हाला आमच्या पक्षाची बैठक घेण्यास परवानगी द्याल, अशी मागणीही काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील यांनी केली आहे.

चौकट:

नगरसेवकांचा कार्यकाळ संपून त्यांचे अधिकारही संपुष्टात आल्याने त्यांच्याकडून होत असलेल्या नियमांचे उल्लंघन गैर असल्याचे आयुक्तांनी १० ऑगस्ट रोजी माजी नगरसेवकांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे. असे असताना सोमवार दि २२ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान भाजप नगरसेवकांना बैठक घेण्यास परवानगी कोणी दिली? जर परवानगी न घेता त्यांनी मनमानी करून सभा घेतली असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा खडा सवालही पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post