आश्वासनांची खिरापत नको, पण वेळेला दोन घास द्या....


प्रेस मीडिया लाईव्ह :

मायबाप सरकारने गणेशत्सवाच्या निमित्ताने दिनांक २९  ऑगस्ट २०२२ पर्यंत राज्यातील सर्व  शासकीय कर्मचारी व अधिकारी, तसेच सेवानिवृत्त पेन्शन धारक यांना माहे ऑगस्ट २०२२  चे मासिक वेतन व सेवानिवृत्ती वेतन अदा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या महिनाभरात आठवा वेतन आयोग, महागाई भत्ता, सेवानिवृत्ती वयोमर्यादा वाढ यांच्यावर चर्चा सुरू केल्या आहेत. त्यापैकी महागाई भत्ता वाढ जाहीर केली  आहे. या सर्व बाबींचे स्वागत आहे. परंतु मायबाप सरकारने यामधील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांचा विचार करावा असे वाटते आणि ही कळकळीची विनंती आहे. शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना वेतन मिळेल यात शंका नाही, त्याचबरोबर जे सेवक  सेवानिवृत्त झाले आहेत व सेवानिवृत्तीनंतर त्यांना ग्रॅज्युएटी, प्रॉव्हिडंट फंड, उर्वरित रजेचा परतावा व मासिक पेन्शन देखील चालू आहे, अशा व्यक्तींना लाभ होईल.  

                 परंतु वेगवेगळ्या शासकीय विभागातील बरेच सेवानिवृत्त  कर्मचारी व अधिकारी असे आहेत की जे गेल्या सात ते नऊ महिन्याच्या पूर्वी सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत, परंतु त्यांना ग्रॅज्युएटी, प्रॉव्हिडंट फंड, तात्पुरती किंवा कच्ची पेन्शन किंवा कायमस्वरूपी मासिक पेन्शन अद्याप मिळालेले नाही, अशा व्यक्तींनी सण कसा साजरा करावा? बऱ्याच जणांचे मुला-  मुलींचे लग्न , शिक्षण , गृह कर्ज, शिक्षण कर्ज या गोष्टी प्रलंबित आहेत. त्यांनी काय करावे? ज्या कर्मचाऱ्यांवर कोणती चौकशी समिती नाही, कोणतीही कोर्ट केस नाही  अशा व्यक्तींचा यात काय दोष? पण या शासकीय व्यवस्थेतील असे काही कर्मचारी आहेत, ज्यांनी त्यांच्या कार्यालयास, राज्याला इतर राज्यांमधील, इतर देशांमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले आहेत आणि त्यांची अशी अवस्था असेल तर दोष कोणाचा? परंतु हे सर्व काहीही असले तरी यातून एक मार्ग काढता येणे शक्य आहे. या सणासुदीला ज्यांना पेन्शन चालू नाही, अशांसाठी उचल रक्कम म्हणून रुपये ८ ते १० हजार तरी पदरात पडावेत. या अनुषंगाने आश्वासनांची खैरात नको, पण वेळच्या वेळी दोन घास मिळावेत हीच अपेक्षा. 

डॉ. तुषार निकाळजे. 

( सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी)

Post a Comment

Previous Post Next Post