मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा

 शिष्टमंडळाकडून विविध मागण्यांचे प्रांताधिका-यांना निवेदन सादर


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : रेशनकार्डधारकांना नियमित व मोफत  धान्य मिळावे यासह आरोग्य सेविका , बांधकाम कामगार ,घरेलू कामगार व पूरग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज गुरुवारी येथील प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.तसेच शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन शिरस्तेदार संजय काटकर  यांच्याकडे सादर करत याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई सातत्याने वाढत असून परिणामी कामगार , कष्टकरी व श्रमिक वर्गाला विविध आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.तसेच जगायचे कसे असा प्रश्न भेडसावत आहे.त्यात सर्वसामान्य वर्गाला रेशनकार्ड मिळणाऱ्या धान्याचाच एकमेव आधार आहे.असे असतानाच तोही मुलभूत हक्क व अधिकार हिरावून घेतला जातो की काय ,अशी गंभीर परिस्थिती निर्माण होवू पहात आहे.कारण रेशनकार्डावर मिळणारे धान्य नियमित मिळत नाही ,ही वस्तुस्थिती आहे.मोफत धान्य नियमित देण्याबाबत देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.कष्टक-यांचे शहर म्हणून इचलकरंजी शहरातील गरीब व पाञ साडे ३ हजार कुटूंबांना प्राधान्याने मोफत धान्य योजनेचा लाभ मिळण्याची गरज आहे.याच अनुषंगाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज गुरुवारी येथील लक्ष्मी मार्केट ,मलाबादे चौक , शिवतीर्थ परिसर या मार्गाने  प्रांत कार्यालयावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी शिष्टमंडळाने शिरस्तेदार संजय काटकर यांना निवेदन देत सर्वसामान्यांची कैफियत मांडली.

या चर्चेदरम्यान मोर्चाचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ कामगार नेते दत्ता माने ,भरमा कांबळे ,आनंद चव्हाण,सदा मलाबादे यांच्यासह अनेकांनी शासनाच्या चुकीच्या धोरणावर जोरदार टीका करत सर्वसामान्य जनतेच्या हक्काची ही लढाई न्याय मिळेपर्यंत चालूच राहिल ,असा इशारा दिला.

यावेळी प्रांताधिका-यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात , रेशनकार्डधारकांना माणसी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ नियमित व मोफत मिळावे ,यंञमाग कामगारांना तीन दिवसांचा आठवड्याचा खोटी पगार मिळावा ,अन्न धान्यावरील जीएसटीचा ५ टक्के कर रद्द करावा , कुरुंदवाड व इंगळीतील पुरग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करावे , पुरवठा कार्यालयात स्वतंत्र स्टाफ भरुन कार्यालय सक्षमपणे चालू ठेवावे ,आशा वर्करना आरोग्य खात्याचेच काम देवून कायम कामगारांचा दर्जा मिळावा ,घरेलू कामगारांना १२ हजार रुपये सन्मानधन व ६० वर्षांवरील कामगारांना प्रति महिना ३ हजार रुपये पेन्शन मिळावी , गणेशोत्सवासह दसरा व दिवाळी सणासाठी रवा ,साखर ,मैदा , खाद्यतेल रेशनवर मिळावे , बांधकाम कामगारांची कल्याणकारी महामंडळाच्या योजनेतील लाभासाठी नोंदणी व नूतनीकरण तातडीने व्हावे ,खाद्यतेलाची साठेबाजी करणा-यांवर कडक कारवाई करावी ,अशा विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.तसेच या प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी , अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या मोर्चामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष कांबळे, नूरमहंमद बेळकुडे ,जीवन कोळी ,भाऊसो कसबे , धनाजी जाधव ,संजय टेके , गोपाळ पोला,अरजय पाटील , पार्वती म्हेत्रे ,कुमार कागले ,प्रकाश कारके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post