मधकेंद्र योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांचे आवाहन


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर :  (जिमाका): महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र (मधमाशा पालन) योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित झाली आहे. यासाठी जिल्ह्यातील बेरोजगार तरुण, शेतकरी, मधपाळ, शेतकरी गट, महिला बचतगट, संस्था, कंपन्या, सोसायट्या प्रगतशिल शेतकरी व जंगल परिसरातील मध उद्योग करणारे लाभार्थी व उद्योजकांनी जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयास समक्ष संपर्क साधून माहिती घ्यावी व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी.डी. कुरुंदवाडे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण व महिलांनी  शेतीपुरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून न करता एक मुख्य उद्योग म्हणून मध उद्योग केल्यास त्यातून ग्रामीण रोजगार निर्मितीला चालना मिळेल. शेती पिकांचे व फळबागांचे परागीभवन होऊन त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन त्यांना मध उद्योगाअंतर्गत मध, मेण, रॉयल जेली, पराग आदीचे उत्पादन मिळेल. या उत्पादनांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या उद्योगात स्पर्धा नाही मधपाळाकडून उत्पादित झालेला मध, मेण व तयार होणा-या मधमाशांच्या वसाहती या देखील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून शासकीय हमी दराने खरेदी करण्यात येणार आहे. 

मधपाळासाठी पात्रता- वय १८ वर्ष पूर्ण असावे, अर्जदार साक्षर असावा व मधपालन करण्याची इच्छा असावी. 

केंद्र चालक (वैयक्तिक) - पात्रता वय २१ वर्ष पूर्ण असावे, अर्जदार दहावी पास असावा, अर्जदाराकडे किंवा त्यांच्या कुटुंबाकडे शेतजमीन असावी व लोकांना मधमाशापालनाचे प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी.

 केंद्र चालक (संस्था) - पात्रता - संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेकडे मधमाशा पालनाचे प्रशिक्षण देण्याची क्षमता असणारे सेवक असावेत, संस्थेच्या नावे अथवा भाड्याने किमान १० वर्षे मुदतीने घेतलेली एक एकर शेती असावी व संस्थेकडे किमान १ हजार चौ.फु. क्षेत्राची सुयोग्य इमारत असावी.

छंद प्रशिक्षण- शाळा, कॉलेज विद्याथी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, जेष्ठ नागरीक व शेतकरी, ५ दिवसाचे प्रशिक्षण, नोंदणी शुल्क प्रती लाभार्थी रुपये २५ राहील व मंडळाकडून एक मधपेटी रोखीने घेणे अनिवार्य राहील.

मधमाशापालन योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थींनी ५० टक्के स्वगुंतवणूक रक्कम महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय, कोल्हापूर येथे रोखीने जमा करावी. मधपेट्या व साहित्यासाठी मिळणारे ५० टक्के अनुदान हे मंडळाकडून दिले जाणार आहे. लाभार्थीचे अनुदान कार्यालयात जमा झाल्यानंतर लाभार्थीना (मधपाळांना) १० दिवसाचे निशुल्क निवासी प्रशिक्षण पाटगांव, तालुका भुदरगड येथे दिले जाईल. प्रशिक्षणात मधमाशा शोधणे, पकडणे, मधपेटीत मधमाशा भरणे, मधपेटीतील मध काढणे आदींचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. तसेच केंद्रचालकांना २० दिवसांचे निशुल्क निवासी प्रशिक्षण मधसंचालनालय महाबळेश्वर येथे दिले जाणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लागणारे इतर साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६५१२७१  व मध पर्यवेक्षक डी. आर. वाडेकर ९४०४९४४६७० वर संपर्क साधावा.


Post a Comment

Previous Post Next Post