कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत



प्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील

दि. 28 : - मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत दुःख आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे.दुर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकांचे काम आणि अनुषंगिक सुविधांबाबतही यंत्रणांना सूचना केल्या आहेत. विशेषतः जखमींना तातडीचे उपचार मिळावेत, जखमी तसेच मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक अशा सुविधा तातडीने मिळाव्यात, असे निर्देशही दिले आहेत.

कुर्ला परिसरातील नाईकनगर सोसायटीच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीची नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमींची विचारपूस केली.नाईकनगर सोसायटीची चार मजली इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे नगरविकास मंत्री श्री. देसाई यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. घटनास्थळाची पाहणी करत असताना दोघा जखमींना ढिगाऱ्याखालून सुखरूप वाचविण्यात आले. त्यांना तत्काळ नजिकच्या राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. यानंतर श्री. देसाई यांनी राजावाडी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून जखमींना सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबत सूचना केल्या. अपघातातील सर्व जखमींचा खर्च राज्य शासन तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येईल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post