सेवा हमी कायद्यानुसार जलसंपदा विभागाच्या दहा सेवा ऑनलाईन


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर :  (जिमाका): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या सेवा हमी कायद्यानुसार जलसंपदा विभागाने आपल्या खात्यांतर्गत असणाऱ्या दहा सेवा ऑनलाईन केल्या आहेत. या सेवा जलसंपदा विभागाच्या  wrd.mahaonline.gov.in व aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून यापुढे सेवाबाबतचे अर्ज आवश्यक कागदपत्रासहीत ऑनलाईन स्विकारण्यात येणार आहेत. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभाग (उत्तर)चे  कार्यकारी अभियंता सुरेश नाईक यांनी केले आहे.

या दहा सेवांमध्ये पाणीवापर संस्थेस देय पाणी हक्क मंजुरी देणे, पाणीवापर संस्थेस पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे, बिगरसिंचन पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे, पाणीपट्टी देयक तक्रार निवारण करणे, लाभक्षेत्राचा दाखला देणे, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, कटक मंडळे यांना घरगुती पाणीवापर परवाना देणे, महानगरपालिका, खासगी विकासक, विशेष नगरविकास प्रकल्प यांना घरगुती/ औद्योगिक पाणीवापर परवाना देणे, औद्योगिक प्रयोजनासाठी पाणीवापर परवाना देणे, नदी व जलाशयापासून अंतराचा दाखला देणे व उपसा सिंचन परवानगी देणे या सेवांचा समावेश आहे.


Post a Comment

Previous Post Next Post