सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत बंदिस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि विद्यापीठ निधीचा वैयक्तिक वेतन वाढीसाठी अपहार करणाऱ्या भ्रष्ट कुलसचिवांवर कारवाई होणार

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेसमोर दोन्ही विषय मांडणार असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांचे लेखी आश्वासन


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत बंदिस्त करण्याचे काम तातडीने थांबवावे व भ्रष्ट कुलसचिवांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, विद्यापीठ अपहार निधीची वसुली करावी या मागण्यांसाठी काल विद्यापीठामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दीपक जाधव, आम आदमी पक्षाचे प्रवक्ते डॉ अभिजित मोरे, आपचे रोहन रोकडे, ॲड दत्तात्रय भांगे, निलेश वांजळे, अक्षय शिंदे, ॲड आशिष ताम्हाणे तसेच आजी-माजी विद्यार्थी अभ्यास गटाचे सतीश पवार, श्रीकांत मिश्रा, सुरेश देवढे, महावीर साबळे, अनिल गायकवाड, कमलाकर शेटे आदी उपस्थित होते.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इमारत आवारात विद्यार्थी व नागरीकांनी येऊ नये म्हणून हा परिसर बंदिस्त करण्याचे काम काल अचानक सुरु केले होते. हे काम पूर्ण बेकायदेशीर व विद्यार्थी विरोधी आहे. तसेच पुणे महापालिकेने देखील यापूर्वीच या कामाला स्थगिती दिली असून देखील काल संध्याकाळी अचानक पुणे विद्यापीठ कूलसचिवांकडून विद्यापीठाची मुख्य इमारत बंदिस्त करण्याचे काम सुरु केले. ही बातमी समजताच आम आदमी पक्ष आणि आजी-माजी विद्यार्थी अभ्यास गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सदर बांधकाम तात्काळ थांबवावे यासाठी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. 

 यापूर्वीही असे बांधकामाचे प्रयत्न झाले होते आणि त्यावेळी विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाच्या दबावानंतर हे काम रद्द केल्याचे तत्कालीन कुलगुरू डॉ करमळकर यांनी विद्यार्थी संघटनांना सांगितले होते. तरीदेखील काल अचानक पुन्हा काम सुरू करण्यात आले होते. पण ठिय्या आंदोलनानंतर प्र- कुलगुरु डॉ सोनवणे यांच्या आदेशानंतर हे काम थांबवण्यात आले.

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी बेकायदेशीरपणे दरमहा 50 हजार रूपयांची वेतनवाढ तीन वर्षे घेतल्याचे पत्र उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला पाठवले आहे. विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ फंडाचा गैरवापर करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे कुलसचिवांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवावे. अपहाराची सर्व रक्कम त्यांच्याकडून वसूल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी यावेळी  आंदोलकांकडून करण्यात आली. 

यावेळी प्र-कुलगुरू डॉ सोनवणे यांच्या सोबत आंदोलकांची सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर विद्यापीठाची मुख्य इमारत बेकायदेशीररीत्या बंदिस्त करणाऱ्या व विद्यापीठ निधीचा वैयक्तिक वेतनवाढीसाठी अपहार करणाऱ्या भ्रष्ट कुल सचिवांवर कारवाई करणार आणि पुढील व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत निर्णय घेणार असे लेखी उत्तर डॉ सोनवणे यांनी आंदोलकांना दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. 



Post a Comment

Previous Post Next Post