पॉईंट टू बी नोटेड : विद्यापीठ प्रशासनाचे बदलते स्वरूप: बोनेट फ्लॅगसाठी उपद्व्याप.....

 विद्यापीठ प्रशासनाचे बदलते स्वरूप : 

बोनेट फ्लॅगसाठी उपद्व्याप..... 


प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ तुषार निकाळजे :

बोनेट म्हणजे चार चाकी गाडीच्या इंजिनावर असलेले झाकण. फ्लॅग म्हणजे या झाकणावर लावलेला संस्थेचा किंवा पदाचा झेंडा. याला बोनेट फ्लॅग म्हटले जाते. बोनेट फ्लॅग  हा तसा दुर्लक्षित प्रकार. परंतु काहीवेळा याचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्यामागच्या भूमिका देखील लक्षात राहतील. असेच एका शैक्षणिक संकुलातील कार्यालय प्रमुखांनी लढवलेली शक्कल. कार्यालय प्रमुख बदलला की वेगवेगळे बदल होतात. जसे पूर्वी राजा बदलला की राज्य बदलतो अशी एक म्हण होती तसाच प्रकार. तर सांगायचे असे, या शैक्षणिक संकुलातील कार्यालय प्रमुखांनी कार्यालयातील जवळजवळ बारा चार चाकी गाड्यांचे  बोनेट फ्लॅग बदलण्याचे  आदेश दिले. " हे बोनेट फ्लॅग उत्तम प्रकारचे असावेत ", याची शोध मोहीम करण्यासाठी एक अधिकारी व एक कारकून नेमला जाऊ शकतो. हे दोघेजण वेगवेगळ्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये व क्वचित प्रसंगी बाहेर राज्यातही याबाबत दौरा किंवा चौकशी करण्यासाठी जात. साधारणता एक महिना वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या बोनेट फ्लॅग तयार करणाऱ्या कंपन्यांचे नमुने व कोटेशन( दरपत्रक) आणले जातात. या एक महिन्यांमध्ये या दोन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन कामाच्या नावाने बोंब. हे नमुने व कोटेशन आणल्यानंतर त्यावर विचारविनिमय किंवा चर्चा होऊन नंतर हे बारा बोनेट फ्लॅग तयार करून घेतले जातात व कार्यालयीन चार चाकी वाहनांना(कार्यालय प्रमुखांसहीत) लावले जातात. या १२  बॉनेट फ्लॅगची  किंमत साधारणतः एक लाख रुपयांपर्यंत असू शकेल. या एक लाख रुपयांव्यतिरिक्त जे दोन कर्मचारी व अधिकारी एक महिना या बोनेट फ्लॅगवर  संशोधन करत असतील, त्यांच्या महिन्याचा पगार रुपये ५० हजार  व ३० हजार  असा अंदाजे ८०  हजार रुपयांचा पगार, तसेच त्यांचे एस.टी.भाडे, रेल्वेचे भाडे असा एकूण अंदाजे खर्च काढल्यास हे बारा बोनेट फ्लॅग दोन लाखापर्यंत जाऊ शकतात. असो. किमान हे बोनेट फ्लॅग एक लाख पन्नास हजार रुपयांचे असले, तरी याची किंमत तशी फारच जास्त. हे बोनेट फ्लॅग  साध्या पद्धतीने बनविल्यास सर्व १२  बोनेट फ्लॅग यांची जास्तीत जास्त किंमत ५०  हजार रुपये पर्यंत जाऊ शकते. दीड लाख रुपयांचे बोनेट फ्लॅग करिता खर्च करण्याऐवजी ५०  हजार रुपयांचे जर साधे व टिकाऊ बोनेट फ्लॅग वापरल्यास काहीच हरकत नसते. यातील उरलेले एक लाख रुपये जर संबंधित शिक्षण संकुल किंवा  विद्यापीठाने दोन विद्यार्थ्यांना एक वर्ष स्पर्धा परीक्षा शिक्षणासाठी खर्च केले असते, तर एखादा विद्यार्थी यु. पी. एस. सी. किंवा एखादा विद्यार्थी एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण झाला असता व त्या विद्यार्थ्यांनी नंतर विद्यापीठामध्ये सल्लागार म्हणून मोफत काम केले असते व विद्यापीठाचे प्रतिमा उंचावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे योगदान दिले असते. कुठे खर्च करावा, कोणता खर्च अवैध आहे, संशोधनासाठी काय करावे, विद्यार्थ्यांच्या अडचणी काय असू शकतात, अशा इतर प्रकारच्या काही गोष्टी त्यांनी विद्यापीठातील किंवा शिक्षण संकुलातील अधिकाऱ्यांना सांगितल्या असत्या, तर कदाचित अवैध गुणवाढ प्रकरण, बेकायदेशीर नोकरभरती ,बोगस महाविद्यालय प्रकरण, अपात्र अधिका-यांची भरती,पदोन्नती यांवर नियंत्रण,पेपर फुटी प्रकरण इत्यादी प्रकरणे  घडली  नसती. विद्यापीठाची प्रतिमा राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय  स्तरावर उंचावली असती. परंतु या बोनेट फ्लॅग वर विनाकारण लाखो रुपये खर्च करणे म्हणजे प्रतिष्ठा जपण्यासाठी  केलेला खटाटोप असावा. परंतु काही वेळा असे लक्षात येते कि हा बोनेट फ्लॅग बरा, कारण  काही अधिकाऱ्यांनी भारतीय बनावटीच्या गाड्या न वापरता परदेशी बनावटीच्या गाड्या वापरण्याचा फंडा चालू केला आहे.यातले काही महाभाग या परदेशी बनावट गाडीमध्ये फिरताना दिसतात. परंतु स्वदेशी बनावटीच्या वस्तूंवर भर देणाऱ्या चर्चेमध्ये आपले ज्ञान पाजळविताना दिसतात. हे सगळं काही असले  तरी या चारचाकी गाड्यांच्या देखबाल- दुरुस्ती- पुरवठा करणाऱ्या कार्यालयातील विभागात एखादा अधिकार मंडळातील सदस्य कार्यरत असतानाही डोळ्यावर पट्टी  बांधून तोंडावर बोट ठेवत असेल तर यासारखं दुर्दैव कोणते ?

Post a Comment

Previous Post Next Post