अशी विचित्र कोंडी या आमदारांची झालेली आहे,


प्रेस मीडिया लाईव्ह :

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे  महाराष्ट्रात सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यातून मार्ग काढणे  तितके सोपे नाही, कारण हा एकूणच मामला विविध कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकलेला आहे. त्यात पुन्हा बंडखोर आमदारांना त्यांची आमदारकी जाण्याची भीतीही आहे. दुसर्‍या बाजूला उद्धव ठाकरे यांच्याकडचे आमदार कमी होऊन गुवाहाटीमधील शिवसेना आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे. या आमदारांच्या बंडातून एकच गोष्ट दिसून येत आहे की, उद्धव ठाकरे साहेब तुम्ही भाजपसोबत या, आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत नांदायला जमणार नाही, पण ज्या शरद पवारांनी मुख्यमंत्री बनवले, त्यांच्याशी कशी काय प्रतारणा करायची हा उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे असे विचित्र त्रांगडे झालेले आहे. शिंदे गटाला फार काळ गुवाहाटीला राहता येणार नाही. त्यांना कधी तरी महाराष्ट्रात यावे लागेल. शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे काय होणार याविषयी अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

शरद पवार यांना राष्ट्रीय पातळीवर राजकीय खेळी करण्यामध्ये आजवर तसे यश आलेले नाही, नाही , पण महाराष्ट्रात मात्र राजकारणातील अनेक गोष्टी त्यांच्या डाव्या हाताचा खेळ आहे. थंडा करके खावो, या काँग्रेसच्या नीतीप्रमाणे शरद पवारांनी जसे अजित पवारांचे बंडे मोडीत काढले, तसे शिंदेंचे बंडही मोडून काढतील, असे वाटत आहे. त्यामुळेच या बंडखोरांबाबत सुरुवातीला आक्रमक असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. कारण या आमदारांचा उद्धव ठाकरे यांना विरोध नसून ते ज्या दोन पक्षांसोबत आहेत, त्यांना विरोध आहे. म्हणूनच शिवसैनिकांच्या मनाचा कल बघूनच उद्धव ठाकरे यांना भूमिका घ्यावी लागणार आहे. शिंदे यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त असली तरी त्यांना कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावे लागेल, पण कुठल्या पक्षात विलीन व्हायचे असा पेच त्यांना पडलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाप्रमाणे बंडखोर महाराष्ट्रात आले तरी, उद्धव ठाकरे हे काही महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे बंडाचा हेतू सफल होत नाही. तसेच ते कुठल्या पक्षात विलीन झाले तरी त्यांचे स्वतःचे महत्त्व उरणार नाही, अशी विचित्र कोंडी या आमदारांची झालेली आहे,

Post a Comment

Previous Post Next Post