सागरी क्षेत्रातील संधींकडे युवकांनी सकारात्मकतेने पहावे--- उपमुख्यमंत्री अजित पवार

 अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयात 'सागरी संग्रहालय आणि संशोधन केंद्राचे' उदघाटन


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : भारताला आणि महाराष्ट्राला समृद्ध सागरी किनारा लाभलेला असून नौदल, सागरी प्रवासी वाहतूक, व्यापारी वाहतूक, मासेमारी आदी मोठ्या संधी असलेल्या या क्षेत्राकडे युवकांनी व्यवसाय, रोजगाराच्या संधी म्हणून सकारात्मकपणे पाहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

अनंतराव पवार अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयात अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद आणि इंडियन मेरिटाईम फौंडेशनच्यावतीने (आयएमएफ) स्थापन करण्यात आलेल्या 'सागरी संग्रहालय आणि संशोधन केंद्राचे' उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास वेकफिल्ड फूड्स प्रा. लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश मल्होत्रा, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदच्या महासचिव प्रमिला गायकवाड, 'आयएमएफ'चे प्रेसिडेंट एमिरट्स कमांडर राजन वीर, अध्यक्ष कॅप्टन आनंद दीक्षित आदी उपस्थित होते. 

जगातील ९५ टक्के मालवाहतूक सागरी मार्गाने होते असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, केवळ देशांतर्गतच नव्हे तर जागतिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता सागरी क्षेत्रामध्ये आहे. बंदरांच्या विकासासाठी खासगी क्षेत्र पुढे येत आहे. सागरी क्षेत्र खडतर असले तरी भक्कम पगार, आर्थिक बळ देणारे असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्याकडे वळले पाहिजे. 

अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेले सागरी संग्रहालय आणि संशोधन केंद्र विद्यार्थ्यांना सागरी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन यासाठी उपयुक्त ठरण्यासह रोजगाराला चालना देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही श्री. पवार यांनी व्यक्त केला. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी स्थापन केलेल्या मराठा आरमाराची माहिती नव्या पिढीला व्हावी म्हणून संग्रहालय मोठ्या जागेत नेण्यासह जहाजाच्या प्रतिकृती, त्या काळातील जहाजांवरील उपकरणे ठेवण्यासह आदी आवश्यक सुधारणांसाठी आवश्यक निधी 'कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व' (सीएसआर) निधी आदींच्या माध्यमातून निश्चितपणे निधी उपलब्ध करुन दिला जाईल. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सागरी क्षेत्राचे महत्त्व ओळखून जलशक्ती, जलवाहतूक, जलसिंचन, बंदरांच्या उभारणीला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी देशाच्या विकासासाठी तसेच वर्चस्वासाठी सागरी क्षेत्राचे महत्त्व ओळखले होते. त्यामुळे त्यांनी बंदरांचा विकास, जलमार्गांचा विकास, जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबले होते. तसेच धोरण त्यापुढील काळातही राबवण्यात आले, असेही श्री. पवार म्हणाले. 

देशामधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा हा महत्त्वाचा मुद्दा बनला असून महाविद्यालयांमधून १५  लाखापेक्षा अधिक अभियंते शिकून बाहेर पडतात. तथापि, यापैकी केवळ १ लाख विद्यार्थ्यांनाच आपल्या आवडीच्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये नोकरी, रोजगाराच्या संधी मिळतात. उर्वरित १४ लाख विद्यार्थ्यांना तडजोड करुन अन्य क्षेत्रात रोजगार शोधावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रात मागणीपेक्षा जास्त पुरवठा होत असून रोजगार पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी योग्य दिशा निवडली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी कॅ. दीक्षित म्हणाले, तरुण पिढीला नौदल, व्यापारी नौदल, तटरक्षक दल, जहाजबांधणी, बंदरे, सागरी क्षेत्रातील तेलविहिरी, नैसर्गिक वायू प्रकल्प आदी विविध संधींची माहिती व्हावी या उद्देशाने हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सागरी क्षेत्रात रोजगाराकडे वळण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

संस्थेच्या प्राध्यापकांनी लिहिलेल्या 'टेक ट्रान्सफर बुकलेट'चे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासचिव प्रमिला गायकवाड यांनी केले. 

कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत सुतार, सहसचिव संदीप कदम, भगवानराव साळुंके, महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील ठाकरे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post