श्री दत्त शिरोळ येथे सेंद्रीय, जैविक शेती आणि बांबू लागवड याविषयी शेतकरी मेळावा उत्साहात


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ/ प्रतिनिधी:

 श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेला 'जैविक खत निर्मिती व जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा योग्य प्रमाणात वापर तसेच बांबू लागवड व त्याचे फायदे' याविषयी शेतकरी मेळावा उत्साहात फार पडला. श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री दत्तचे चेअरमन, उद्यानपंडीत गणपतराव पाटील होते.

 यावेळी बोलताना प्रमुख मार्गदर्शक जैविक व सेंद्रिय प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. किशन चंद्रा म्हणाले, शिरोळ तालुका आणि परिसरातील क्षारपड जमीन सुधारण्यासाठी दत्त कारखाना मोठा प्रयत्न करत आहे. या प्रकल्पाला यशही येत असून शेतीमधील उत्पादन वाढून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा  शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण वापर करावा. 'ओरिजनल वेस्ट डी कंपोजर' त्याचबरोबर 'एनहान्सर' या नावाने जैविक कीटकनाशक आणि टॉनिक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून त्याचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना अनेक फायदे मिळू शकतात. यामध्ये जमिनीचा पोत सुधारणे, गांडुळांची संख्या वाढणे, बियाणांच्या उगवण शक्तीत वाढ होणे, सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया, बुरशी, व्हायरस यांच्यापासून रोपांचे संरक्षण, जमिनीची सुपीकता वाढणे तसेच पन्नास टक्क्यांपर्यंत खर्चात बचत होऊ शकते.  एनहान्सर बरोबर वापरलेल्या औषधांची परिणामकारकता वाढून थोड्याच कालावधीमध्ये चांगले परिणाम दिसून येतात. वरील औषधे योग्य प्रकारे हाताळल्यास उसाचे उत्पादन २०० टनाच्याही पुढे जाऊ शकते. तसेच इतर सर्व पिकांच्या उत्पादनातही याचा फायदा होऊ शकतो.

    अरुण वांद्रे हे व्यावसायिक साधन बांबू लागवड याविषयीची माहिती देताना म्हणाले, क्षारपड, मुरमाड, खडकाळ अशा सर्व प्रकारच्या जमिनीत बांबू लागवड करता येते. महापूर परिस्थिती अथवा विषम हवामान आणि प्रतिकूल परिस्थितीतही बांबू तग धरून राहते. त्यामुळे भूस्खलन होत नाही. मनुष्यबळ, औषधे, मजूर कमी लागतात. आंतरपीकही घेता येते. ४ वर्षांनंतर उत्पन्न सुरु झाल्यानंतर ५० वर्षे आपण फायदा घेत राहू शकतो. त्यामुळे अर्थकारण समजून घेऊन शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी.

    उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले,   शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती शाबूत ठेवता येईल आणि पुढच्या पिढीला देता येईल. शेतीमधून अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीमधील सेंद्रीय कर्ब वाढविला पाहिजे. सुपीकता वाढवली पाहिजे. दत्त कारखान्याच्या वतीने सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आणि नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी देण्यात येत आहेत, याचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा. शेतकऱ्यांची उन्नती हाच कारखान्याचा उद्देश आहे. पुरबुडीत क्षेत्रात बांबू आणि शुगर बीट पर्याय म्हणून घेऊ शकतो. लवकरच गावागावात शेतकरी मेळावेही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपले अनुभवही सांगितले. तसेच 'ओरिजनल वेस्ट डी कंपोजर' आणि 'एनहान्सर' वापराचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

    प्रारंभी स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.स्वागत व प्रास्ताविक शेती विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, माजी आमदार उल्हास पाटील, संचालक रघुनाथ पाटील, भैय्यासाहेब पाटील, संजय पाटील, विजय सूर्यवंशी, प्रमोद पाटील, दरगू गावडे, बाळासाहेब पाटील, शेखर पाटील,  कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, महेंद्र बागे, महादेव धनवडे, ए. एस. पाटील, अमर चौगुले, शरद पाटील, प्रा. मोहन पाटील, प्रा. प्रतीक्षा पाटील यांच्यासह कारखान्याचे सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post