काँग्रेस : एक परिवार एक तिकीट' या फॉर्म्युल्याची घोषणा



प्रेस मीडिया लाईव्ह :

कॉँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षात 'एक कुटुंब-एक तिकीट' फॉर्म्युला लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.याशिवाय सर्वच प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांसाठी यात एक ठरावीक टर्मही निश्चित करण्यात आली आहे. गांधी कुटुंबाला या दोन्ही कठोर नियमांत सूट देण्यात आली आहे.

काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबीर उदयपूर येथे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झाले आहे. या शिबिरात पक्षसंघटनेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यावर प्रामुख्याने चर्चा केली जाणार असून त्यादृष्टीने काही प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. 'एक परिवार एक तिकीट' या फॉर्म्युल्याची घोषणा करत पक्षांतर्गत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

एखाद्या परिवारातला व्यक्ती जर राजकारणात सक्रिय होत असेल आणि त्याला तिकीट हवे असेल तर त्याने किमान पाच वर्षे संघटनेत काम केलेले असले पाहिजे, अशी अट असणार आहे. तसेच एका व्यक्तीला एका पदावर केवळ पाच वर्षेच राहता येईल.

काँग्रेसच्या सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मणीशंकर अय्यर यांनी 2011 मध्ये एका कार्यक्रमात बाबरी विध्वंसातील राव यांच्या कथित भूमिकेमुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यापासून अंतर राखल्याचे स्पष्ट केले होते. चिंतन शिबिराच्या ठिकाणी नरसिंह राव यांचे पोस्टर लावल्यामुळे काँग्रेस सत्तेसाठी सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकल्याची चर्चा आहे.


निवडणुकीतील सततच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात मागील काही महिन्यांपासून अंतर्गत कलह वाढला आहे. जी 23 या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सातत्याने पक्ष संघटनेत बदलाची मागणी केली जात आहे. या शिबिरात जी-23 गटाचे नेतेही सहभागी झाल्याने गांधी कुटुंबालाही या चिंतन शिबिरातून बळ मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणीही होऊ शकते.

Post a Comment

Previous Post Next Post