शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लटके कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई :  शिवसेनेचे लोकप्रिय आमदार रमेश लटके यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आज सकाळी त्यांचा मृतदेह दुबईहून अंधेरी येथे आणण्यात आल्यानंतर शिवसैनिक, राजकीय नेते यांच्यासह सर्वच स्तरांतील मान्यवरांनी अंधेरीतील कामगार कल्याण भवन येथे त्यांचे अंत्यदर्शन घेतले.स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लटके कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पारशी वाडा स्माशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कामगार कल्याण भवन येथे सकाळी 9 वाजल्यापासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री ऍड. अनिल परब,स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर,शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू, आमदार रवींद्र वायकर,आमदार प्रकाश सुर्वे,आमदार सुनील राऊत, आमदार अँड. आशीष शेलार, आमदार ऍड.पराग अळवणी, आमदार अमित साटम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई व अमोल कीर्तिकर, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

दुपारी 12 वाजता कामगार कल्याण भवन येथून लटके यांची अंत्ययात्रा मार्गस्थ झाली. अंधेरी पूर्व गुंदवली मोगाविरा बँक, आमदार रमेश लटके जनसंपर्क कार्यालय, वर्मानगर, जुना नागरदास रोड, शिवसेना शाखा, पारसी पंचायत रोड, पंपहाऊस सबवे, आघाडी नगर, शेर- ए-पंजाब, गुरुद्वारा सर्कल, शांती नगर, होली फॅमिली स्कूल, चकाला वजन काटामार्गे दुपारी पारशी वाडा स्मशानभूमीत साडेतीनच्या त्यांची अंत्ययात्रा पोहचली. साडेचार वाजता मुलगा अमेय यांनी रमेश लटके यांना मुखाग्नी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post