पॉईंट टू बी नोटेड : विद्यापीठ प्रशासनाचे बदलते स्वरूप : हृदय सम्राट परीक्षा विभाग:

 पॉईंट टू बी नोटेड :   विद्यापीठ प्रशासनाचे बदलते स्वरूप :  हृदय सम्राट परीक्षा विभाग


प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ. तुषार निकाळजे :

कोणत्याही विद्यापीठाच्या परीक्षा विभागास त्या विद्यापीठाचे हृदय म्हटले जाते. याचे कारण विद्यार्थ्यांच्या परीक्षा ते निकाल, पदवी प्रमाणपत्र इत्यादी महत्त्वाची काम येथे चालतात.गेल्या दोन महिन्यापूर्वी एका विद्यापीठात घटना घडली. त्या विद्यापीठाच्या दस्तुरखुद्द कुलगुरू व अधिसभा सदस्यांनी परीक्षा विभागातील कर्मचारी उर्मट असल्याचे वर्तमानपत्रात जाहीर केले. याच कुलगुरू महोदयांनी सेवानिवृत्तीच्या नंतर दोन दिवसांनी याच विद्यापीठाची  प्रशासन व्यवस्था दुबळी  असल्याचे पुन्हा वर्तमानपत्रात जाहीर केले. आता प्रश्न असा उद्भवतो जर कुलगुरू आणि अधिकारी मंडळी विद्यापीठाच्या सर्व प्रशासन व्यवस्थेवर गेल्या पाच वर्षात काय करीत होते ? मागील पाच वर्षापासून हे प्रशासन दुबळे आहे का व्यवस्थित आहे की त्याचे सबलीकरण करायचे?  हे लक्षात आले नाही आणि कार्यकाल संपला संपल्यानंतर प्रशासन व्यवस्था दुबळी आहे ,असे जाहीर करणे म्हणजे एकप्रकारे स्वत:चे अपयश स्विकारण्याघा प्रकार म्हणावा. जर आपण एखाद्या विद्यापीठाच्या संपूर्ण परीक्षा विभागाच्या कामकाजाचा मागोवा घेतल्यास वेगळे चित्र समोर येईल. सुरुवात परीक्षा विभागाच्या बांधकामापासूनच करूयात.विद्यापीठाचा परीक्षा विभाग हा केवळ केंद्रीय मुल्यमापन  भवन म्हणून बांधकाम झालेले. वर्तमानपत्रात जाहीर केलेल्या या केंद्रीय मुल्यमापन भवनमध्ये को-या उत्तर पत्रिका ठेवणे,नंतर त्या मागणीनुसार महाविद्यालयांना देणे, परीक्षा झाल्यानंतर न तपासलेल्या उत्तर पत्रिका भवन मध्ये संकलित करणे, विषय निहाय  परीक्षकांकडून तपासून घेणे ,गुणांची माहिती परीक्षा विभागाकडे पाठविणे एवढ्याच प्रकारच्या कामांचा समावेश असतो. या इमारतीची रचनाच अशा पद्धतीने केलेली असते. केवळ सहा तास प्राध्यापक तेथे बसून उत्तर पत्रिका तपासतील अशा प्रकारची संरचना केलेली. निकाल जाहीर करणारे कर्मचारी,अधिकारी, डेटा प्रोसेसिंग युनिट, प्रोग्रामर्स हे इतर इमारतीमध्ये असतात. परंतु या केंद्रीय मुल्यमापन भवन मध्ये परीक्षा विभागातील कर्मचारी,अधिकारी ,डेटा प्रोसेसिंग युनिट प्रोग्रामर यांचे स्थलांतर केले जाते. त्यामुळे चार मजली असलेली ही इमारतही कामकाजासाठी कमी पडते. कारण येथे विद्यार्थी,पालक, महाविद्यालयाचे कर्मचारी, प्राध्यापक यांचा कायम वावर असल्याने एक प्रकारच्या भाजी मंडईचे स्वरूप या परीक्षा विभागास येते. या परीक्षा विभागाच्या बांधकामाचा प्रस्ताव किंवा ठराव माहिती अधिकारामध्ये विद्यापीठाकडे मागितल्यास सदर ठराव अधिसभेमध्ये न मांडला  गेल्याचे निदर्शनास येते. याचा अर्थ अधिसभा हे  विद्यापीठाचे अधिकार मंडळ आहे, त्यांनाही इमारत बांधायची किंवा नाही? याची परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही. याला मनमानी कारभार म्हणावा का? या केंद्रीय मुल्यमापन भवनमध्ये एका वेळेस दोनशे प्राध्यापक पाच ते सहा तास उत्तर पत्रिका तपासतील फक्त अशी सोय केलेली असते.तेथे पूर्णवेळ(सकाळी ९ ते रात्री ८:३० )काम चालणाऱ्या परीक्षा विभागाच्या २५०  कर्मचारी व अधिकारी यांना स्थलांतरित केले जाते. उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांना फक्त अडीच बाय साडेतीन फुटाचे टेबल व एक खुर्ची एवढीच जागा लागते. परंतु या जागेमध्ये कर्मचाऱ्यांना काम करताना अडीच बाय पाचशे दोन टेबल, फाईल फोल्डर ठेवण्यासाठी एक गोदरेजचे कपाट एवढी जागा ऍडजेस्ट करावी लागते. त्याच बरोबर संगणक, प्रिंटर याचाही समावेश तेथे असतो. एखाद्या विद्यापीठातील परीक्षा विभागात काही कामानिमित्त गेल्यास भाजी मंडई येथील किंवा मच्छी मार्केट मधील किंवा शेअर मार्केटमधील स्वरूप आल्याचे दिसून येईल. कारण परीक्षा विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या टेबल पुढे किमान दहा मिनिटांमध्ये पाच विद्यार्थी किंवा महाविद्यालयाचे कर्मचारी कामासाठी उभे असतात.गेल्या तीन वर्षांमध्ये कोविडच्या निमित्ताने सामाजिक अंतर या नियमाला हा परीक्षा विभाग तात्काळ व अतिसंवेदनशील विभागाच्या कर्मचाऱ्यांची हजेरी कोविड १९ च्या कालावधीमध्ये १०० टक्के असण्याचा नियम होता. हा परीक्षा विभाग अति संवेदनशील व तात्काळ कामाचा विभाग असल्याने येथे शंभर टक्के हजेरी होती. या कालावधीमध्ये परीक्षावर परीक्षा घेतल्या गेल्या त्यामुळे परीक्षा विभागातील कर्मचारी कायम कामामध्ये,विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणे, परीक्षा फॉर्म भरून घेणे, प्रमाणपत्र देणे इत्यादी कामांमध्ये व्यस्त. परीक्षा विभागाशी संबंधित काही खासगी तांत्रिक विभाग व काही खाजगी तांत्रिक कंत्राटदार काम करत असतात. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी. फास्ट ट्रॅक वर काम करणे ऐवजी संथ गतीने काम करणे,त्यामध्ये काही विशिष्ट चुका होणे ही बाब म्हणजे कॉर्पोरेट पॉलिटिक्सचा एक प्रकार असतो. या खाजगी कंत्राटदारांनी जर बिनचूक व लवकर काम केले तर ते काम संपल्यानंतर पुढील कालावधीमध्ये त्यांना काम नसल्याने त्याचे पैसे मिळणार नाहीत. हे येथे नमूद करावेसे वाटते.म्हणजे आपणास पुढच्या महिन्याचा पगार मिळणार नाही, असे लक्षात आल्यामुळे या महिन्यातील काम प्रलंबित ठेवणे हा प्रकार येथे दिसतो. या सर्व समन्वयाचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होते. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व उत्तीर्ण प्रमाणपत्र तीन ते चार महिन्यांनी छपाई करून दिल्याची उदाहरणे आहेत. या कालावधीमध्ये काही विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. असे प्रसारमाध्यमात चर्चा झाली. यामध्ये परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांची कुचंबणा होते.परीक्षा विभाग हा चार मजली असल्याने तेथे लिफ्ट असणे अपेक्षित. परंतु गेल्या पाच सहा वर्षात तेथे लिफ्टस नाही. त्यामुळे पन्नास वर्षाच्या पुढील कर्मचारी,महिला यांनी तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर पायी चालत जाणे व पायी उतरणे किती शक्य? एक प्रसंग घडल्याचे उदाहरण आहे . तिसर्‍या मजल्यावरील परीक्षा विभागामध्ये एका कर्मचाऱ्यास सकाळी ११ वाजता चक्कर आल्याने त्याला दवाखान्यात नेण्यासाठी कार्यालयाची अंबुलन्स मागविली.ॲम्बुलन्स येईपर्यंत त्यास लिफ्ट नसल्यामुळे लाकडी खुर्चीत बसवून, चार जणांनी जिना उतरून , उचलून आणले. या विभागात येणारे अपंग अथवा दिव्यांग विद्यार्थी किंवा प्राध्यापक किंवा महाविद्यालयीन कर्मचारी यांची काय परिस्थिती असेल? ऐन गर्दीच्या व कामाच्या सीझनमध्ये अधिकाऱ्याने अर्धा अर्धा तास एखाद्या कॅन्टीनमध्ये चहा-कॉफी पिण्यात जाणे यास काय म्हणावे? कामाची विभागणी देखील असमान.बीए, बीएस्सी,बीकॉम, एम कॉम,एम ए, एम एस सी ,अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, एलएलबी, एल एल एम व इतर बऱ्याच परीक्षा यांचे निकालाचे काम येथे चालते.तक्रार अर्ज स्वरूपात येणाऱ्या कामांच्या संख्याचे अवलोकन केल्यास पुढील आकडेवारी आपल्यासमोर येईल.बीएच्या टेबलला रोज ३४ अर्ज येतात, बी कॉम च्या टेबलला रोज ३२ अर्ज येतात. व्यवस्थापन शास्त्र टेबलला १९ येतात, बीएससीच्या टेबल १८ अर्ज, अभियांत्रिकी परीक्षेला परिस्थिती वेगळी तेथे प्रथम, वर्ष द्वितीय वर्ष ,तृतीय वर्ष ,चतुर्थ वर्ष अशी कामाची विभागणी. प्रथम वर्षाचे काम पाहणाऱ्या टेबलला ५४ आज अर्ज, द्वितीय वर्षाचे काम पाहणा-या टेबलला ५२ अर्ज, तृतीय वर्ष टेबलला ६८ आणि चतुर्थ वर्ष टेबलला ११५ अर्ज येत असतात. अधिकाऱ्यांना ही असमानता दाखवूनही त्यावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. चतुर्थ वर्षाच्या टेबलला एखाद्या प्रामाणिक कर्मचाऱ्याला खच्ची करण्यासाठी बदली केली जाते. तेथे जास्त काम असते. त्याच्यावर वारंवार देखरेख ठेवली जाते.प्रशासकीय अधिकारी कामा ऐवजी हजेरी पत्रकावर जास्त लक्ष ठेवून असतात. काही अधिकारी दुपारच्या जेवणाच्या सुटीनंतर अर्धा तास एखाद्या कट्ट्यावर गप्पा मारत बसतो. कर्मचाऱ्यांनी सुधारणा सुचविण्यासाठी दिलेल्या अर्जाला कचरा टोपली दाखवली जाते. कारण अधिकाऱ्यांचे वर्चस्व संपुष्टात येते का काय? ही भीती. काहीजण पगार मिळतो म्हणून काम करू, काहीजण नुसतेच पाट्या टाकणारे, कामावर श्रद्धा नसणारे, ज्यांची कामावर श्रद्धा आहे त्यांचे खच्चीकरण करणारे असे वेगवेगळे प्रकार या व्यवस्थेत पहावयास मिळतात.अशा या संवेदनशील व मोठ्या कामाचे स्वरूप असलेल्या विभागातील प्रमुखास उसंत नसते. ते सुट्टीच्या दिवशी देखील काम करत असतात. पण यातील आश्चर्याची गोष्ट की अशा अधिकाऱ्याची पीएच.डी.यशस्वी होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार अधिकाऱ्याने सहा महिने सुट्टी घेतल्याचे आठवत नाही. परीक्षा विभागात सहा महिन्यात सुट्टी घेणे म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. परंतु या पीएच.डीचा पाठपुरावा केल्यास एक गोष्ट निदर्शनास येते , या विद्यापीठाचा कुलगुरू सेवानिवृत्त होताना या परीक्षा विभागातील अधिकार्‍याची पीएच.डी.हातात पडते. हा योगायोग म्हणावा. म्हणजे कुलगुरू पदाच्या शर्यतीमध्ये उतरताना पीएच.डी.प्राप्त असल्याने किमान अर्ज भरण्यास तरी संधी उपलब्ध आहे, असे समजण्यास हरकत नाही. कोरोनाच्या कालावधीमध्ये रात्री १२:४५ वाजता कर्मचाऱ्याने कार्यालयात ज्यादा वेळ थांबून निकाल लावल्याची उदाहरणे आहे. परंतु याचे श्रेय घेणारे परीक्षा अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी दोन दिवसांनी गेस्ट हाउस मध्ये पुरणपोळीचा आस्वाद घेतात. बिचारा कर्मचारी परीक्षेचा निकाल लावताना पिठलं भाकरी खाऊन हे योगदान देतो. याचा कुठेही उल्लेख नसतो. या पुरणपोळीच्या जेवणावळीत फक्त अधिकारी मंडळी असतात. पुरणपोळीच्या जेवणाचा ढेकर दिल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये अगदी छाती ठोकून सांगतात,आम्ही राज्यातील परीक्षेचा प्रथम निकाल लावला. ट्रांन्सस्क्रीप्ट,प्रमाणपत्र, समन्वय,गैरप्रकार इत्यादी प्रश्न वेगळेच, आजपर्यंत ब-याच चौकशी समित्या, परीक्षा विभागाची लेखापरीक्षणे गुलदस्त्यातच राहिली. या परीक्षा विभागाचे बारकाईने निरीक्षण केल्यास अधिकाऱ्यांच्या जवळ असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगळी वागणूक,कामगार संघटनांमध्ये काम करणा-या कर्मचाऱ्यांना वेगळी वागणूक,कोणाच्याही अध्यात किंवा मध्यात नसणा-या कर्मचाऱ्यांना वेगळी वागणूक असे चित्र दिसते. या सर्व अनियमित गोष्टींबद्दल या हृदय सम्राट असलेल्या परीक्षा विभागाच्या हृदयावर किती ताण येत असेल? याची कल्पना केलेली बरी.

Post a Comment

Previous Post Next Post