चिमुकल्या भाचे मंडळींनी मामाच्या गावाच्या सफरीचा मनसोक्त आनंद लुटला.


प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : रंगीबेरंगी टोप्या घालून उंट आणि घोडागाडीच्या सफरीची मजा. टोपी, फुगे, गॉगल, रंगीबेरंगी मास्क भेट मिळताच चिमुकल्यांच्या चेह-यावर फुललेले निरागस हास्य आणि हिंदी-मराठी गीतांवर मनसोक्त नाचणारी बच्चे कंपनी.अशा वातावरणात चिमुकल्या भाचे मंडळींनी मामाच्या गावाच्या सफरीचा मनसोक्त आनंद लुटला. मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या जमान्यात जग जवळ येत असले, तरी नाती मात्र दुरावत चालली आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीतील हरविलेली मामाच्या गावाला जाण्याची मजा समाजातील उपेक्षित मुलांना अनुभवायला मिळावी, याकरीता या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे गणेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी हा उपक्रम आयोजित केला जातो. यावेळी किशोर सरपोतदार, अजित कुमठेकर, अ‍ॅड.सुभाष मोहिते, महेंद्र अग्रवाल, आनंद सराफ, कुमार रेणुसे, संदीप गायकवाड, सागर पवार, सागर घम, मनिषा निंबाळकर, मंदार राजेंकर, सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेटे आदी उपस्थित होते.

माहेर, आदिवासी समिकरण अनाथ सेवा बीड, संकल्प वसतीगृह अहमदनगर, एकलव्य न्यास, बचपन वर्ल्ड फोरम, आपलं घर, संतुलन पाषण आदी संस्थांमधील २१० मुले-मुली या उपक्रमात सहभागी झाले होते. उपक्रमाचे यंदा २३ वे वर्ष आहे.

सेवा मित्र मंडळ चौकात चॉकलेट व खाऊ देऊन चिमुकल्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी नाच रे मोरा, सांग सांग भोलानाथ यांसह झिंगाट सारख्या गाण्यांवर चिमुकले मनसोक्त नाचले. तर उंट आणि घोडयावरुन रपेट मारत चॉकलेट खाण्याचा आनंद देखील लुटला. पुढील दोन दिवस या मुलांसाठी विविध स्पर्धा, सहली, आॅस्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंडळाचे अमर लांडे, विक्रांत मोहिते, सचिन ससाणे, वैभव वाघ, उमेश कांबळे, अमेय थोपटे, विशाल भोसले, अ‍ॅड.नितीन झंझाड, कुणाल जाधव, सागर नांगरे, लाला परदेशी, राहुल घोडके, हिमांशु मेहता आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post