पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे, दि.२५:आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. 

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त ॲड. विकास ढगे-पाटील, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. माणिक मोरे आदी उपस्थित होते. 

दोन वर्षानंतर पालखी सोहळा होणार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक संख्या राहण्याचा अंदाज असल्याचे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, भाविकांची कोणतीही अडचण होणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून त्यासाठी गेली ३-४ महिन्यापासून पालखीबाबत नियोजन सुरू आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासोबत पालखी सोहळा प्रमुखांसमवेत बैठका घेऊन तसेच पालखी मार्ग, पालखी मुक्काम येथील पाहणी केली आहे. 

जिल्ह्याला वारीची असलेली दीर्घ परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा नेहमीप्रमाणे संपूर्ण योगदान देतील असा विश्वास व्यक्त करून जिल्हाधिकारी म्हणाले, या वर्षीचा पालखी सोहळा आगळा वेगळा राहील यादृष्टीने सर्व नियोजन प्रभावीपणे करण्यात येईल. पालखीमार्ग, पालखी मुक्काम या ठिकाणच्या लक्षात आलेल्या सर्व त्रुटी १० जूनपर्यंत दूर कराव्यात. यावर्षीची वारी अधिक प्रभावीपणे 'निर्मल वारी' व्हावी यासाठी सर्व ते प्रयत्न करू असेही ते म्हणाले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, यावर्षी गतवेळच्या वारीपेक्षा दीडपट अधिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. शौचालयांच्या ठिकाणी वीज, पुरेसे पाणी आदी व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावर रुग्णालयांतील खाटा आरक्षित करणे, पुरेसा औषध पुरवठा आदी आरोग्य सुविधा केल्याचेही ते म्हणाले. 

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता आदींकडून पूर्वतयारीचा आढावा घेतला. पालखी सोहळा प्रमुखांकडून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांचा संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. 

बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान व श्री संत तुकाराम महाराज देवस्थानचे पदाधिकारी, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, महानगरपालिका, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य विभाग, पोलीस, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, घनकचरा व्यवस्थापन, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post