ब्रेकिंग न्यूज : प्रसाद कुलकर्णी यांना ' बागल पुरस्कार ' जाहीरप्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर ता. २४ ,समाजवादी प्रबोधिनीचे (इचलकरंजी) सरचिटणीस आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत लेखक, 'प्रबोधन प्रकाशन ज्योती' मासिकाचे संपादक  प्रसाद कुलकर्णी यांना २०२२ चा ‘भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे  अशी माहिती बागल विद्यापीठाचे अध्यक्ष ऍड.अशोकराव साळोखे व कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. टी.एस.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.भाई माधवराव बागल विद्यापीठातर्फे १९९२ पासून हा पुरस्कार दिला जातो. माधवराव बागल यांच्या जयंतीदिवशी म्हणजे शनिवार ता. २८ मे २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक भवन ,दसरा चौक,कोल्हापूर पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पुरोगामी विचारवंत प्रा. राम पुनयानी ( मुंबई )यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.शाल, फेटा, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पहार व रोख पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रसाद कुलकर्णी हे गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. समाजवादी प्रबोधिनीचे १९८५  पासून ते पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत.निस्पृहपणे अग्रक्रमाने सातत्याने प्रबोधन करणारे  प्रबोधक कार्यकर्ते, साक्षेपी संपादक, मार्क्सवाद ते गांधीवाद आणि भारतीय संस्कृती ते भारतीय राज्यघटना आदी विविध विषयाचे व्यासंगी, तीसहून अधिक पुस्तके - पुस्तिका आणि तीन हजारांवर लेख लिहिणारे सिद्धहस्त लेखक,  साहित्य ते समाजकारण अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करणारे ख्यातनाम वक्ते, वृत्तपत्रांचे सदरलेखक व  पत्रलेखक आणि त्याबरोबरच मराठीतील नामवंत गझलकार - कवी अशी त्यांची सर्वदूर ओळख आहे. त्यांच्या ब्लॉगवर शेकडो लेख व युट्युब चॅनेलवर शेकडो गझला - कविता उपलब्ध आहेत.त्यांच्या दीर्घकालीन सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाची दखल घेऊन यंदाच्या पुरस्कारासाठी निवड केली गेली आहे.अशी माहिती पत्रकार  परिषदेत देण्यात  आली.

भाई माधवराव बागल पुरस्कार आजवर कॉ.संतराम पाटील,चित्रकार गणपतराव वडणगेकर, प्रा.डॉ.एन.डी.पाटील,डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे,दलीतमित्र बापूसाहेब पाटील, कुमार केतकर, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, सुशीलकुमार शिंदे,निळू फुले,डॉ.आ.ह.साळुंखे, ज्ञानेश महाराव, आचार्य शांताराम गरुड,डॉ.सुनीलकुमार लवटे,डॉ.भालचंद्र मुणगेकर ,डॉ.भारत पाटणकर यांच्यासह अनेक मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे.

सायंकाळी ५.३० ला होणाऱ्या या पुरस्कार प्रदान समारंभाला आणि सकाळी ९.३० वाजता शाहू मिल समोरील भाई माधवराव बागल यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सर्वानी  अगत्याने उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.या पत्रकार परिषदेला चंद्रकांत यादव, व्यंकाप्पा भोसले, रवी जाधव, संभाजीराव जगदाळे, नामदेवराव कांबळे, उदय धारवाडे, जितेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post