सुताची साठेबाजी करणा-यांवर सरकारने कारवाई करावी - अशोक स्वामी

 कापूस दरवाढ सूत गिरण्यांसह यंञमाग उद्योगासाठी ठरणार धोक्याची घंटा..

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी : विविध कारणांमुळे कापूस दरात होत असलेली सततची वाढ राज्यातील सूत गिरण्यांबरोबरच यंत्रमाग उद्योगासाठी धोक्याची घंटा ठरू लागली आहे. ही दरवाढ अशीच आणखी काही दिवस राहिली तर सर्व सूत गिरण्यांसह यंत्रमाग कारखाने कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सुताची साठेबाजी करणा-यांवर केंद्र व राज्य सरकारने कारवाई करुन संभाव्य धोका टाळावा ,अशी मागणी महाराष्ट्र स्पिनिंग मिल फेडरेशनचे चेअरमन अशोक स्वामी यांनी केली आहे.

मागील वर्षी भारतात कापसाचे उत्पादन ७० टक्केच  झाल्याने कापसाचे दर भरमसाठ वाढले.परिणामी याचा फायदा कापूस व्यापाऱ्यांनी घेतला. यावर नियंत्रण आणण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असताना त्याकडे माञ सोयीस्कर दुर्लक्ष झाले. याचा फटका सुतगिरण्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.सध्या खुल्या बाजारात कापसाचा दर १ लाख १० हजार प्रति खंडी असा आहे. या दराने जरी कापूस घ्यायचा म्हंटले तरी  व्यापारी मंडळी कापसाची उपलब्धता अल्प आहे असे खोटेनाटे सांगून सुतगिरणी चालकांना अक्षरशः नागवत आहेत 

केंद्र सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापसाचा हमी भाव ६ हजार ५० रुपये असा ठरवून दिला आहे. परंतू खुल्या बाजारात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून १३ हजार रुपये इतका प्रचंड दर मिळत असल्याने शेतकरी आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विक्री करत आहेत. येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होणार असल्याचे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपला सगळा कापूस खुल्या बाजारात विक्री करुन संपवला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांकडे अजिबात कापूस शिल्लक नाही ,अशी स्थिती आहे  

सूतगिरणी व्यवस्थापन कापूस खरेदीसाठी बाजारात फिरत आहे.परंतू बाजारपेठेत कापसाची टंचाई जाणवत आहे.सध्या सूत गिरण्यांकडे आठ दिवस पुरेल इतकाच कापूस शिल्लक आहे ,ही परिस्थिती बदलेल अशी स्थिती सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळे जून महिन्यापासून सूत गिरण्या बंद पडण्यास सुरवात होणार आहे.

दरम्यान ,कापसाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे दक्षिण भारतातील दि साऊथ इंडिया स्पिनर्स असोसिएशन कोईमतूर यांनी कापसाचे नवीन उत्पादन येईपर्यंत सूतगिरण्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील सहकारी व खासगी सूत गिरण्या बंद करण्याचा निर्णय जाहीर करावा ,अशी मागणी अनेक सूत गिरणी चालकांनी महाराष्ट्र स्पिनिंग मिल फेडरेशनचे चेअरमन अशोक स्वामी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात लवकरच महाराष्ट्रातील सुतगिरणी चालकांचे संचालक  वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर ,केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांना भेटणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेणार असल्याचे अशोक स्वामी यांनी सांगितले.

दरम्यान ,यावर्षी कापसाचे दर वाढल्याने काही कापूस व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कापूस घेवून साठेबाजी केली आहे.तसेच  जादा दरात तेजी मंदी करून बाजारात जाणीवपूर्वक टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा व्यापाऱ्यांवर केंद्र व राज्य सरकारने धाडी टाकून उपलब्ध कापूस , साठवणुकीचा कापूस रास्त भावात खुल्या बाजारात उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही अशोक स्वामी यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post