आज कोल्हापूर परिसर सुजलाम सुफलाम दिसतो आहे त्याची पायाभरणी शाहू महाराजांनी केलेली आहे.

समाजातल्या शेवटच्या माणसाच्या विकासाची तळमळ असणारे ते दुर्मिळातील दुर्मिळ राजे होते.....प्रसाद कुलकर्णी 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी ता. ५ लोकराजे राजर्षी शाहू महाराज हे माणसातले राजे आणि राजांतील माणूस होते. ब्रिटिश सम्राज्यशाहीने जम बसविलेला असतानाच्या काळात अठ्ठावीस वर्षे राजर्षींनी लोकाभिमुख राज्यकारभार केला. आपल्या संस्थानाच्या विकासाकडे अतिशय गंभीरपणे ते पाहत होते.राधानगरी धरणाची निर्मिती,शेती- सहकार- शिक्षण - कला आदी सर्व क्षेत्राकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. आज कोल्हापूर परिसर सुजलाम सुफलाम दिसतो आहे त्याची पायाभरणी शाहू महाराजांनी केलेली आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाच्या विकासाची तळमळ असणारे ते दुर्मिळातील दुर्मिळ राजे होते, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानात ' राजर्षी शाहू: जीवन व कार्य ' या विषयावर बोलत होते.हे व्याख्यान श्रीमती आ.रा.पाटील कन्या महाविद्यालय, मराठी विभाग आणि समाजवादी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. स्वागत प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. सुभाष जाधव यांनी करून दिला.प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले ,कुस्ती आणि शिकारीसाठी लावणारे शरीर सामर्थ्य, राजकारणासाठी लागणारा मुत्सद्दीपणा आणि दूरदर्शीत्व,  योग्य माणसाची पारख करणारी गुणग्राहकता, नाट्य व कलांना प्रोत्साहन देणारी कलावृत्ती ,समाजसुधारकाला लागणारी क्रियाशीलता आणि सत्ता आणि संपत्ती लोकांच्या उद्धारासाठी आहे याचे सदैव असलेले स्वभान व समाजभान ही राजर्षींच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती.म्हणूनच ते एक आगळेवेगळे राजे ठरले.छत्रपती शिवाजी महाराजांनंतर लोक उद्धारासाठी कार्य करणारे राजे म्हणून शाहूरायांकडे पाहावे लागेल. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या व्याख्यानातून राजर्षी शाहू महाराजांचे जीवन व कार्य याची सखोल मांडणी केली.

अध्यक्षस्थाना वरून बोलताना प्राचार्य डॉ.अनिल पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात जे कार्य केले ते त्यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक आहे.सर्वांगीण परिवर्तनाची भूमिका राजे मांडत होते. त्यांनी इथल्या जातीव्यवस्थेला चूड लावण्याचे अत्यंत मूलभूत काम केले. माणसाकडे माणूस म्हणून पाहिले पाहिजे हा त्यांचा विचार अतिशय महत्त्वाचा आहे.कन्या महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आभार प्रा.डॉ.प्रियांका कुंभार यांनी मानले.प्रा.प्रतिभा पैलवान यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post