श्री दत्त शिरोळ येथे सेंद्रीय व जैविक शेती याविषयी शेतकरी मेळावा उत्साहात



प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ/ प्रतिनिधी:

 श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेला सेंद्रीय व जैविक शेती याविषयी शेतकरी मेळावा उत्साहात फार पडला. श्री दत्त पॉलिटेक्निकच्या सभागृहात आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री दत्तचे चेअरमन, उद्यानपंडीत गणपतराव पाटील होते.


यावेळी बोलताना प्रमुख मार्गदर्शक जैविक व सेंद्रिय प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. किशन चंद्रा म्हणाले, आपल्या भागात जमिनी मोठ्या प्रमाणात खराब झाल्या असून त्यांना ठीक करणे गरजेचे आहे. शेतीमधील उत्पादन वाढवल्यास शेतकऱ्यांचे राहणीमानही सुधारू शकते. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, त्याचा शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण वापर करावा. 'ओरिजनल वेस्ट डीकंपोजर' त्याचबरोबर 'एनहान्सर' या नावाने जैविक कीटकनाशक आणि टॉनिक शेतकऱ्यांसाठी आणले असून त्याचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना अनेक फायदे मिळू शकतात. यामध्ये जमिनीचा पोत सुधारणे, गांडुळांची संख्या वाढणे, बियाणांच्या उगवण शक्तीत वाढ होणे, सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया, बुरशी, व्हायरस यांच्यापासून रोपांचे संरक्षण, जमिनीची सुपीकता वाढणे तसेच पन्नास टक्क्यांपर्यंत खर्चात बचत होऊ शकते.  एनहान्सर बरोबर वापरलेल्या औषधांची परिणामकारकता वाढून थोड्याच कालावधीमध्ये चांगले परिणाम दिसून येतात. वरील औषधे योग्य प्रकारे हाताळल्यास उसाचे उत्पादन २०० टनावर जाऊ शकते तसेच इतर सर्व पिकांच्या उत्पादनातही याचा फायदा होऊ शकतो.

  सौ. तेजा घोरपडे यांनी मधुमक्षिका पालन या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेती व मधुमक्षिकापालन हे एकमेकाला पूरक असून दोन्ही एकाच वेळी शेतकरी करू शकतात हे सांगून या नव्या व्यवसायातून शेतकरी मोठा नफा मिळू शकतात हे उदाहरणासह स्पष्ट केले.

उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, १५ एप्रिल नंतर सेंद्रीय व जैविक शेती तसेच मधुमक्षिकापालन याविषयी दत्त कारखान्याच्या वतीने कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. शेतीमधून अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीची सुपीकता वाढवली पाहिजे. दत्त कारखान्याच्या वतीने सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आणि नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी देण्यात येत आहे, याचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा.

 प्रारंभी स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हाईस  चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक रघुनाथ पाटील, भैय्यासाहेब पाटील, विजय सूर्यवंशी, प्रमोद पाटील, माजी संचालक जिन्नप्पा गेंडूगोळ, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, ए. एस. पाटील, अमर चौगुले, शरद पाटील, प्रा. मोहन पाटील यांच्यासह कारखान्याचे सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post