निवडणुका लांबणीवर पडल्याने कार्यकर्ते हतबल



प्रेस मीडिया लाईव्ह :

सुनिल पाटील: रायगड जिल्हा प्रतिनिधी :

अलिबाग : झेडपी व पंचायत समितींच्या निवडणुका  कोणत्याही क्षणी जाहीर होण्याच्या शक्यतेमुळे रायगड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्ते  गेल्या सहा महिन्यांपासून प्रचार करीत होते.मात्र, प्रभाग रचने संदर्भातील अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेतल्याने या निवडणुका लांबणीवर पडल्याने कार्यकर्ते हतबल झालेले दिसत आहेत.

आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने वर्षानुवर्षे एकाच पक्षासाठी काम करणाऱ्या गावा गावातील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे नेत्यांची ऊठबस वाढू लागली आहे. यातील काही नेतेमंडळी बेरोजगार तरुणांना अनेक प्रलोभने दाखवून निवडणुकीची कामे करून घेत आहेत. यासाठी मोबाईलवर संदेश पाठवला, तरी हे कार्यकर्ते ठरल्या ठिकाणी हजर होतात.रायगड जिल्हा सामाजिक भेदभावापासून दूर असला, तरी राजकीय पक्षभेद अग्रस्थानी आहेत. त्यामुळे कार्यकर्ते पक्षाला मोठा जनाधार मिळावा, यासाठी सतत कार्यरत असतात. कोरोना काळात तर या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेत सर्वसामान्यांसाठी विविध उपक्रम राबवले. या मध्ये अन्नधान्य, औषधेवाटप अशा प्रमुख उपक्रमांचा समावेश होता.

राजकीय पुढाऱ्यांना वर्षाचे बाराही महिने सतत मतदारांच्या संपर्कात रहावे लागते. हे एकट्या-दुकट्याचे काम नसते आणि कार्यकर्त्यांना पैसे देऊन काम करून घेण्याइतकीही येथील नेतेमंडळी श्रीमंत नाही. निवडणुका जसजशा लांबणीवर पडत आहेत, त्या प्रमाणात निवडणुकीचा खर्च वाढत आहे.गाव बैठकांचे आयोजन करणे, संभाव्य मतदारांची यादी करणे, बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांशी संपर्क साधणे, नवमतदारांची नोंदणी करून घेणे, मतदारांची दुबार नावे कमी करणे, यासह दुसऱ्या पक्षातील मतदारांना आपल्या पक्षात आणण्यासाठी या कार्यकर्त्यांची नेतेमंडळींना आवश्‍यकता आहे. निवडणुका लांबणीवर पडल्याने आता त्यांच्या कामात आणखी भर पडली आहे. त्यामुळे हे कार्यकर्ते दमछाक होत असल्याने नाराजी व्यक्त करत आहेत.

- सुरेंद्र म्हात्रे, विरोधी पक्षनेते, रायगड जिल्हा परिषद

Post a Comment

Previous Post Next Post