जागा वाटपावरून पुन्हा तिढा निर्माण होण्याची शक्‍यता



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : जीलानी उर्फ मुन्ना शेख : 

 पुणे - महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे. हाच फॉर्म्युला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा अंमलात आल्यास जागा वाटपाचे सूत्र काय राहील..?  व आपल्या वाट्याला किती जागा येतील ..? , या वरूनच महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पुण्यातील नेत्यांसह इच्छुकांमध्ये धक धक आहे. एकत्र लढवण्याबाबत एकमत झाले असले तरी जागा वाटपावरून पुन्हा तिढा निर्माण होण्याची शक्‍यता आहे.


गेल्या काही वर्षांत पुणे शहरात आधी 11 आणि नंतर 23 अशी एकूण 34 नवीन गाव समाविष्ट झाली. त्या मुळे पुणे महानगरपालिका ही राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका झाली आहे. त्यामुळे या वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये पुणेकरांना एकूण 173 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.सध्या पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविल्यास भाजपसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. महाविकास आघाडीत शिवसेना घटक पक्ष असला, तरी शहरातील राजकीय स्तरावर मात्र तो तिसऱ्या क्रमाकांवर असून पक्षाचे 9 नगरसेवक आहेत. दुसऱ्या क्रमाकांवर कॉंग्रेस असून 10 नगरसेवक आणि पहिल्या क्रमाकांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस असून 41 नगरसेवक आहेत.

पुणे महानगरपालिका निवडणुकीतही महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवायचे झाल्यास जागा वाटपासाठी विद्यमान नगरसेवकांची संख्या, गत निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नगरसेवकांची संख्या हेच सर्वसाधारण सूत्र राहील का..?  असा मोठा यक्ष प्रश्‍न आहे. त्यामुळे एकूण जागांच्या तुलनेत कॉंग्रेस व नंतर शिवसेनेच्याही वाट्याला फारच कमी जागा येण्याची शक्‍यता आहे.  तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडी केली तर हक्‍काच्या जागांवर पाणी सोडावे लागण्याची मोठी भीती आहे ,  त्यामुळे कोणाच्या वाट्याला किती जागा पडतील .? महापौर कोणाचा असणार .?  हे आता लवकरच कळेल.

Post a Comment

Previous Post Next Post