पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणे याची नागपूर तुरुंगातून सुटका

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : जीलानी उर्फ मुन्ना शेख :

 पुणे - पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणे याची रविवारी नागपूर तुरुंगातून सुटका झाली आहे. आठ वर्षानंतर गुंड गज्या मारणे तुरुंगातून बाहेर आला असल्याची माहिती त्याच्या वकीलांनी दिली आहे.

कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यावर दोन खूनाचे आरोप होते. २०१४ मध्ये त्याच्यावर मोक्का कायद्यांर्तगत कारवाई करण्यात आली होती. तेव्हा पासून तो तुरुंगात होता. त्यात त्याची मुक्तता झाल्यानंतर १६ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर गज्या मारणेच्या टोळीने त्याची रॅली काढली होती. बेकायदा जमाव जमवून आणि फटाके फोडत रस्त्यावर दहशत निर्माण केली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा प्रकार घडला होता. या प्रकरणी गज्या मारणेसह त्याच्या साथीदारांवर पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. गज्या मारणेला अटक करुन वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिथे न्यायालयाने त्याला जमीन मंजूर करताच तो न्यायालय परिसरातून फरार झाला होता. 

त्या नंतर ग्रामीण पोलिसांनी त्याचा शोध घेतला व त्याच्या विरोधात महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटी (एमपीडीए) कायद्याने प्रस्ताव तयार केला, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूरी दिली. तेव्हा तो फरार होता. मार्च २०२१ मध्ये त्याला मेढा येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला नागपूर कारागृहात हलवण्यात आले. एक वर्ष स्थानबद्धतेचा आदेश संपल्याने त्याची नागपूर कारागृहातून सुटका करण्यात आल्याचे वकीलांनी सांगितले आहे.

गज्या मारणेची पत्नी जयश्री मारणे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्या नगरसेवक देखील राहिल्या आहेत. जर पक्षाने संधी दिली तर नक्की निवडणूक लढवू, असे देखील जयश्री मारणे यांनी पक्ष प्रवेशा वेळी म्हटले होते. 

Post a Comment

Previous Post Next Post